तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
विनायक मेटे यांचं निधन झालं. पुण्याहून मुंबईकडे येताना एक्स्प्रेस हायवेवरील बोगद्यात त्यांचा बळी गेला. हा अपघात नेमका कसा झाला, रुग्णवाहिका वेळेवर का नाही आली, वगैरे मुद्द्यांचा तपास होईल. नव्हे काटेकोरपणे झालाच पाहिजे. कारण विनायक मेटेंचे जाणं हे एका व्यक्तीचं, एका नेत्याचं जाणं नाही. तर आपल्या समाजातील एका मोठ्या घटकातील दडवल्या गेलेल्या शोषित वर्गासाठी लढणाऱ्या लढवय्याचं जाणं हा त्या अवघ्या मोठ्या वर्गाची हानी करणारं आहे. त्या वर्गाचा घात करणारं आहे. तेही त्यावेळी जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणून सातत्यानं दडपून ठेवलेल्या त्या समाज घटकाला आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी नव्यानं मांडणी सुरु झाली होती.
मराठा समाज म्हटलं की समाजातील अनेक जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांचे बुरखे टरकावले जातात. त्यांचे जातीय चेहरे मराठा द्वेषाचा कंड व्यक्त झाल्याने उघडे पडतात. मराठा म्हटलं की प्रस्थापितच. मराठा म्हटलं की ते मालदारच. मराठा म्हटलं की ते जमीनदारच, अशी सोयीची मांडणी ते करतात त्यातून समाजात ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या या समाजघटकाचे हक्क डावलले जातात. त्यासाठी त्यांना सोयीचं ठरत ते मराठा समाजातील काही मुठभर साखरसम्राट, शिक्षणसम्राट आणि राजकारणसम्राटांचं प्रस्थ. खरंतर इतर समाजातही असे प्रस्थापित तयार झालेत. पण मराठा समाजाच्या बाबतीत ही प्रस्थापित मंडळी दाखवून संपूर्ण समाजच तसा असल्याचं दाखवण्याचा कपटी प्रयत्न होतो. दुर्दैवाने प्रशासकीय आणि अन्य प्रस्थापित यंत्रणांमधील काहींच्या मनातील द्वेषामुळे ती मांडणी न्यायालयातही टिकते.
विनायक मेटेंच्या नेतृत्वाचं वेगळेपण त्यामुळेच मराठा समाजासाठी फायद्याचं होतं. प्रस्थापित वर्गातून न आलेले विनायक मेटे हे प्रस्थापित मराठा नेत्यांमुळे मराठा समाजाचं होणारं नुकसान दूर करू शकत होते. हे मुठभर म्हणजे मराठा समाज नाही, तर मराठा समाज म्हणजे त्यापलीकडे शिवारात राबणारा अल्पभूधारक आहे, शहरांच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा कष्टकरी माथाडी, कामगार आणि कष्टकरी आहे. हे अभ्यासातून बाहेर आलंच आहे. पण विनायक मेटेंच्या नेतृत्वामुळे ते प्रत्यक्षात अभिव्यक्त होत होतं.
विनायक मेटे – बीड ते मुंबई…दिल्ली राहिलीच!
- विनायक मेटे हे मूळ बीड जिल्ह्यातील राजेगावमधील. तेथे त्यांचा जन्म ३० जून १९७० रोजी झाला.
- संवेदनशील मनाच्या विनायक मेटेंनी तरुण वयात सामाजिक चळवळीत सहभाग सुरु केला.
- पुढे मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांच्या हलाखीच्या स्थितीमुळे ते अस्वस्थ झाले आणि मराठा महासंघात सक्रिय झाले.
- स्व. अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत मराठा महासंघातून त्यांनी मोठं काम उभं केलं.
- त्यांचं मराठा समाजासाठीचं काम आणि प्रभाव लक्षात घेत भाजपाने त्यांना १९९६मध्ये विधान परिषदेवर आमदार नियुक्त केले.
- पुढे त्यांनी २००१मध्ये शिवसंग्राम संघटना स्थापन केली.
- मराठा समाजातील उपेक्षित, शोषित वर्गाचा आवाज म्हणूनही संघटना वाढू लागली.
- महाराष्ट्रातील क्वचितच एखादा जिल्हा, तालुका असावा जिथं मेटेंचे कार्यकर्ते सापडणार नाहीत.
- विनायक मेटे यांनी बीड विधानसभा मतदारसंघात २०१४मध्ये निवडणूक लढवली होती.
- मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील विनायक मेटे हे प्रमुख नेत्यांपैकी एक होते.
- मराठा आंदोलनातील हा नेता अभ्यासूही, त्यांचा आवाज दिल्लीत संसदेतही घुमला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. त्याआधीच तो आवाज हरपला.
अखेरचा श्वास घेतला तोही मराठा आरक्षणाच्या लक्ष्यासाठी जाताना…
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. खरंतर आजच त्यांनी बीडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. पण मुंबईत मराठा आरक्षणासाठी आज महत्वाची बैठक होती. त्या बैठकीसाठी बोलावणं आल्यानं ते मुंबईकडे निघाले होते. त्यासाठी प्रवासात असतानाच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ज्या ध्येयासाठी विनायक मेटे जीवनभर लढले त्याच ध्येयासाठी जात असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठ्यांना सुरक्षित आरक्षण द्या…तीच मेटेंना खरी श्रद्धांजली!
आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सामान्य शेतकरी मराठा कुटुंबातून आलेले एकनाथ शिंदे हे आहेत. त्यांनी भाजपाशी असलेल्या संबंधांना उपयोगात आणावं. जर भाजपाने ठरवलं तर इंद्रा साहणी प्रकरणातून आलेली ५० टक्क्यांची मर्यादा हटवत मराठ्यांसह सर्वच नव्या उपेक्षित जातींना आरक्षण देणं अशक्य नाही. इतर कोणत्याही समाजांचं हित धोक्यात न आणता तसं करणं अशक्य नाही. बहुमत त्यासाठी वापरता येईल. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळणं हीच मराठा आरक्षण योद्धा विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात. संपर्क: ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com )