तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष राजकारणात दंग झाले असताना औरंगाबादेतील एका शिक्षकाने शिक्षकांच्या मागण्यांसाठी आपले प्राण पणाला लावले लावले आहेत. औरंगाबादमधील मुकुंदवाडी स्मशानभूमीत शिक्षक गजानन खैरे गेले सहा दिवस उपोषण करत आहेत. मराठवाड्यातील उन्हाचा वाढता तडाखा, पोटात अण्णाचा कण नाही, अशा अवस्थेत खैरे यांची प्रकृती ढासळत आहे. पण राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांना अद्याप या शिक्षकाकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. तसाच अनुभव रोज उठता बसता आरोपांचं राजकारण करणाऱ्या विरोधकांचाही. दोघांचे राजकारण हे फक्त मीडिया केंद्रीत दिसते. आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ माजवा. लोकांना त्यातच गुंतवून ठेवा. नेहमीच्या वास्तवातील प्रश्नांकडे आपोआप सर्वांचे दुर्लक्ष होतंच होतं.
गजानन खैरे यांचे मागणे आपल्या स्वार्थासाठी नाही. ते समस्त शिक्षकांसाठी लढत आहेत. आज नाही बरीच वर्षे ते नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांना समानतेनं वागवण्यासाठी संघर्ष करत आहेत. शिक्षक शिक्षक असतात. ते काही अनुदानितचे वेगळे शिकवतात आणि विनानुदानितचे वेगळे शिकवतात, असं नसंत. पण आपल्याकडे राजकारण्यांनी सत्तेच्या खेळात, मतांची गणितं जमवण्यासाठी नको ती व्यवस्था उभी करून ठेवली आहे. त्यातून शिक्षकांमध्ये प्रचंड भेदभाव होतो. सर्वात वाईट अवस्था विनाअनुदानितप्रमाणेच शिक्षणसेवकांची. ही माणसं म्हणजे सरकारचे वेठबिगारच. खासगी व्यावसायिकांना किमान वेतन कायद्याची आठवण करून देणाऱ्या सरकारला यांच्याबाबतीत तसा किमान वेतनाचा कायदा आठवत नाही.
सातत्यानं सघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने आता गजानन खैरे इरेला पेटले आहेत. मुक्तपीठशी थेट संवाद साधताना ते म्हणाले, गेले सहा दिवस शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरु आहे. जोपर्यंत सर्व मागण्या शासनाकडून मान्य होत नाही तोपर्यंत मी आंदोलनावर ठाम असून माझ्या जीवाला काही झाल्यास अवयवदान करून याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करा. राजकारण्यांना लाज वाटावी, अशी विनंती गजानन खैरे यांनी केली आहे.
एकीकडे हा लढवय्या प्राण पणाला लावून लढत आहे. तर दुसरीकडे निबर सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात दंग आहेत. शिक्षक आमदार विक्रम काळे, किरण सरनाईक, बळीराम पाटील यानी खैरे यांची फोनवरून विचारपूस केली.
शिक्षण उपसंचालक अनिल सावळे यांनीही आंदोलनाची माहिती शिक्षण संचालकांना दिली. खैरे यांची प्रकृती ढासळल्याने आ. नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून आंदोलनाकडे लक्ष वेधत शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. त्या स्मशानात दिवसभर शिक्षकांची रीघ लागलेली असते. पण ज्यांच्याकडे खैरेंच्या मागण्या मान्य करण्याची क्षमता आहेत ते सत्ताधारी मात्र गायब आहेत. शिक्षणक्षेत्रात मोठं काम असलेले हेरंब कुलकर्णींसारखी माणसं उपोषणावर मार्ग काढण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, ते ज्यांचं काम ते गायब आहेत. त्यांना कळत नाही की विरोधकांचे आरोप ते पचवू शकतील. पण एका शिक्षकाच्या उपोषणाची धग त्यांना परवडणार नाहीत. शिक्षकांचा हेतू तुमची सत्ता हटवण्याचा नाही पण जर त्यांच्या हक्काचं देण्याऐवजी तुम्ही दुर्लक्ष करत त्यांच्या जीवाशी खेळणार असाल तर मात्र तुमच्या सत्तेला हादरे मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढं नक्की!
शिक्षक गजानन खैरेंच्या मागण्या काय?
- प्रचलित नियमानुसार १००% अनुदान शिक्षकांना द्यावे…
- अनेक आंदोलनांनंतरही फक्त आश्वासने मिळाली.
- मात्र त्या आश्वासनांची पूर्तता होतच नाही.
- २०११ , २०१४ च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक वाढीनुसार अनुदानाचा टप्पा देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या.
- विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी कोणत्याही शासनाने अनुदान दिले नाही, भाजपा सरकार सत्तेवर आले
- आणि त्यांनी कसेबसे २०% व ४०% अनुदान दिले.
- नंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.
- शासनाने १९ महिन्याचा पगार दिला नाही.
- अघोषित, त्रुटीपूर्तता, अंशत: अनुदानित शिक्षकांना १५ नोव्हेंबर २०१९ आणि २४ जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक पद्धतीने अनुदान टप्पा मिळावा.
- अंशत: अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवासंरक्षणासह समायोजन व वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या सुविधा देण्याचा निर्णय घ्या.
- शिक्षकांना स्मशानभूमीत आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली, ती वेळीच लक्षात घेऊन त्यांना कुठलाही विचार न करता प्रचलित नियमानुसार १००% अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)