तुळशीदास भोईटे
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी बऱ्याच दिवसांनी राज्यातील राजकारण ढवळून काढलंय. त्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या पोटात भीतीने ढवळून आलं असेल. ‘मराठा मार्ग’ या मासिकातील लेखात त्यांनी थेट भाजपाशी युती हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी म्हटल्याने संभाजी ब्रिगेडला किंवा हिनवणाऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर ब्रिगेडी विचारांच्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना कमी लेखणाऱ्यांना धक्का बसणं स्वाभाविकच आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे, आजवर संभाजी ब्रिगेड म्हटले की भाजपावाल्यांच्या विरोधातीलच असे स्पष्ट असल्याने स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना गृहित धरले जात असे. तसेच ते ब्रिगेडी म्हणजे जात्यंध असा शिक्का मारून भाजपा किंवा त्यांच्यासोबत असताना शिवसेनेकडूनही त्यांना बाजूला ठेवणे सोपे जात असे. आता मात्र पुरुषोत्तम खेडेकरांनी मांडलेल्या नव्या विचारांमुळे उजवे, डावे, मध्यममार्गी अशा सर्वांनाच नव्याने विचार करावा लागण्याची आणि संभाजी ब्रिगेडबद्दलच्या भूमिका ठरवणे भाग आहे.
संभाजी ब्रिगेडला मात्र सत्तेची भाकरी तर सोडाच पण साधा तुकडाही मिळू दिला नाही!
आतापर्यंत कसं सारं सुखात चाललं होतं. जेम्स लेन प्रकरण असेल किंवा अन्य कोणतेही भावनात्मक बहुजन समाजाचे म्हणजे स्पष्ट सांगायचं असेल तर मराठा कुणबी समाज समुहाला प्रभावित करणारे प्रकरण असेल तर स्वत: नामनिराळे राहून संभाजी ब्रिगेडच्या आक्रमकतेतून राजकारण साधता येत असे. आतापर्यंत नाही म्हटले तरी किमान दोन वेळा तरी काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यातील सत्ता आणि अनेकदा स्थानिक सत्ताही संभाजी ब्रिगेडच्या उपद्रव शक्तीचा वापर करून त्यांच्या नेत्यांना टिकवता आली. पण त्याबदल्यात या दोन पक्षांनी संभाजी ब्रिगेडला मात्र सत्तेची भाकरी तर सोडाच पण साधा तुकडाही मिळू दिला नाही. नव्हे मिळूच नये अशी दक्षता घेतली, असं म्हटलं तरी चालेल.
प्रवीण गायकवाडांसारख्या प्रभावी नेत्याची उपेक्षा खूप सांगणारी!
काँग्रेस राष्ट्रवादीच्या संभाजी ब्रिगेडला सत्तेपुरतं वापरून नंतर बाजूला टाकायच्या राजकारणाचे सर्वात मोठे उदाहरण संभाजी ब्रिगेडचे प्रभावशाली नेते प्रवीण गायकवाड हे आहेत. त्यांचे नाव २०१९च्या निवडणुकीपूर्वी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आणले गेले. राष्ट्रवादीच्या जवळ असणारे प्रवीण गायकवाड त्यासाठी अल्पकाळचा शेकापवास सोडून काँग्रेसवासीही झाले. पण काँग्रेसमधील एका दाक्षिणात्य नेत्याला महाराष्ट्रात काँग्रेसने एकाही ब्राह्मण उमेदवारी दिली नसल्याचा साक्षात्कार झाला आणि तेथून मोहन जोशी उमेदवार झाले. भाजपाचा प्रभाव असणाऱ्या पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापटांना केक वॉक किंवा श्रीखंडासारखी मुलायम चाल मिळाली. खरंतर त्याचवेळी राष्ट्रवादीकडे असलेल्या नगर मतदारसंघातून लढण्यासाठी सध्या भाजपाचे खासदार असलेले सुजय विखे पाटील जंग जंग पछाडत होते. पाच वर्षे त्यांची तयारी सुरु होती. प्रवीण गायकवाडांचे निकटवर्तीय सांगायचे दादांचे साहेबांशी चांगले आहे. ते काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देणार आहेत. मी भाबडेपणाने विचारायचो, अरे बाबांनो, मग त्यापेक्षा नगर देऊन पुणे का घेत नाहीत? म्हणजे थेट प्रवीण गायकवाडांना आघाडीची उमेदवारी देण्याचा अधिकारच राष्ट्रवादीच्या हाती येईल. पण तसे काही झाले नाही. पुणेही गेले आणि नगरही गेले. भाजपाच्या दोन जागा मात्र वाढल्या. पुढे पुरंदरच्या कार्यक्रमात हे जाहीरणे मांडले. मी कायम स्वतंत्र भूमिका मांडणारा असूनही अनेकांनी ब्रिगेडविरोधी असल्याचा शिक्का मारला. पण ते असो. त्याने फरक पडत नाही. तसेच आज तो विषय नाही.
खेडकरांचे मत योग्यच!
मुद्दा पुरुषोत्तम खेडेकर यांनी जे मत मांडलं आहे ते योग्य आहे, हे सांगण्याचा आहे. ते म्हणालेत, “महाआघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची इच्छा असली तरी ते संभाजी ब्रिगेडला वाटा देण्यास नकार देण्याची शक्यता अधिक आहे. त्यांची प्रवृत्ती संभाजी ब्रिगेडला दूर ठेवून केवळ त्यांच्या नावाचा व कामाचा एकतर्फी लाभ घेणे आहे. तसेच ते संभाजी ब्रिगेडला गृहीत धरून आहेत. भाजपा सत्तेत आली तरी हरकत नाही पण संभाजी ब्रिगेड सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे ही या तिन्ही पक्षांची मानसिकता आहे.” ते जे म्हणालेत ते प्रवीण गायकवाडांच्या आणि पुण्यासह नगर भाजपाच्या पारड्यात टाकून ते जड करण्यातून आधीच सिद्ध झाले आहे.
सत्तेतील वाटेकरी होणे आवश्यकच!
त्यामुळेच पुढे त्यांनी म्हटले त्याप्रमाणे संभाजी ब्रिगेडला सध्याच्या राजकारणात अस्तित्व टिकवून प्रभाव वाढवायचा असेल तर सत्तेतील वाटेकरी होणे आवश्यकच आहे. त्यात गैर नाही. उगाच आता काही, त्याबद्दल वैचारिकतेची नाके मुरडतील. त्या प्रत्येकाने आधी त्यांचा स्वत:चा भुतकाळच नाही तर ऑफ दी रेकॉर्ड असलेला भूतकाळही तपासून घ्यावा. आणि भविष्यातील धोरणाबद्दल १०० टक्के ते खेडेकरांसारखी भूमिका स्वीकारणारच नाहीत, अशी खात्री द्यावी. तसं चार प्रमुख पक्षांमधील एकही पक्ष नाहीच, पण वंचित, मनसेही देऊ शकणार नाहीत. तसेच जर सत्तेच महत्व अस्तित्वासाठी महत्वाचे नसते तर आघाडीत शिवसेनेसारख्या कडवट उजव्या पक्षाबरोबर काँग्रेसी विचारांचे दोन पक्ष कसे एकत्र आले?
खेडकरांची भूमिका समाजासाठीही फायद्याची!
खेडकरांची भूमिका संभाजी ब्रिगेडच्या हिताचा विचार करूनच नाही तर ही संघटना किंवा पक्ष ज्या समाज समुहाचे प्रतिनिधित्व करतो त्या मराठा कुणबींसाठीही फायद्याची ठरु शकेल, असेही मत काही मांडत आहेत. आजवर संभाजी ब्रिगेडची उपद्रवक्षमता राष्ट्रवादी काँग्रेसने खूप वापरून घेतली. मात्र, त्या प्रमाणात ना संघटनेला ना समाजाला काही दिले. त्यामुळे अनेक मराठा समाजातील तरुण ऑफ दी रेकॉर्ड बोलताना व्यथा मांडतात, “निकालाआधी मराठा, निकालानंतर आता थांबा!” अशीच या पक्षाची मानसिकता दिसते. ज्या पद्धतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी अध्यादेशाचा तातडीचा इलाज केला गेला तसा मराठा समाजाचे अराजकीय शैक्षणिक आणि सेवेतील आरक्षण टिकवण्यासाठी झाला नाही, अशी खदखद आहेच.
सत्तेच्या चालकांसमोर अचानक रस्त्यांचा यू टर्न!
त्यामुळे आतापर्यंत संभाजी ब्रिगेडला गृहित धरणाऱ्या आघाडीच्या दोन्ही पक्षांसाठी पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका धक्कादायकच आहे. आतापर्यंत सांगू तसं संभाजी ब्रिगेडवाले करतील, असं हे नेते मानत असत. आता मात्र जेव्हा आटोकाट लढाई अपेक्षित असलेल्या स्थानिक पातळीवरील निवडणुका समोर आल्या असताना अचानक खेडेकरांचा असा अनपेक्षित निर्णय समोर येणं म्हणजे नेहमीच्या अपेक्षित वळणानंतर रस्त्याने यू टर्न घेतल्याचं दिसल्यावर चालकाला धक्का बसण्यासारखेच आहे.
अर्थातच खेडेकरांचे कोण आणि किती ऐकेल असा प्रश्न या नेत्यांकडून पेरला जाईल. संभाजी ब्रिगेडच्या काही प्रभावाखालील नेत्यांकडूनच तशी चर्चा सुरु केली जाईल. परंतु किमान काही प्रमाणात जरी स्वतंत्र लढण्याऐवजी भाजपासारख्या प्रभावशाली पक्षाशी युती करून संभाजी ब्रिगेडचे जे कोणी मैदानात उतरतील किंवा भाजपासाठी लढतील ते आघाडीसाठी वजाबाकीच करतील आणि मोठ्या प्रमाणावर करू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकारण असंच चालतं, हे खेडेकरांचे म्हणणे योग्यच!
धर्मनिरपेक्षता, पुरोगामी विचारांचा हवाला देऊन काहींकडून भाजपाशी युती म्हणजे पाप असल्याचे चित्र उभे केले जाऊ शकते. पण त्यासाठीही खेडकरांनी आघाडीच नाही तर भाजपा आणि शिवसेनेचेही व्यावहारिक राजकारण मांडले आहे. त्यांनी म्हटलं आहे, “ज्येष्ठांना विनंती आहे की कृपया संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करा व भावनिक होऊन कालबाह्य झालेले राजकारण टाळले पाहिजे. इस्राईलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे… त्यातील एक पक्ष मुस्लिम पक्ष आहे… आघाडी सरकार 3 परस्पर विरोधी पक्षांचे बनलेले आहे. गेल्या पन्नास वर्षात एकमेकांचे कट्टर विरोधक सोयीनुसार एकत्र येऊन राजकारणात सत्ता हस्तगत करत आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. शरद पवारांचे पुलोद, मोरारजी देसाई यांचा जनता पक्ष, मायावतींचा बसपा,आणि भाजपचे उत्तर प्रदेश सरकार, मनमोहन सिंग यांचे यूपीए तर महाराष्ट्रातील सध्याचे महाविकास आघाडी सरकार ही काही युती आघाड्यांची उदाहरणे आहेत.”
“संभाजी ब्रिगेडचे ब्राह्मणविरोधी कार्य चालू राहणार” तर भाजपा कशी स्वीकारणार?
पुरुषोत्तम खेडेकरांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या पोटात ढवळून आलं असेल, असे म्हटलं ते केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांबद्दल नाही. तसेच भाजपाच्याही अनेक नेत्यांच्या पोटात ढवळले असेल. आतापर्यंत मुखी हिंदुत्व आणि पोटात जात्यंधत्व दडवून वावरणाऱ्या अशा अनेकांनी संभाजी ब्रिगेड म्हणणे काही तरी वंगाळच असं भासवलं. ब्रिगेडी असा शब्द त्यांनी शिवीसारखा वापरला. पण आता जर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा एकंदरीत आघाडीचे नुकसान होत असेल तर हे नेते किंवा कार्यकर्ते किंवा पत्रकार विचारवंत आनंदाने नाचतील पण त्यावेळी त्यांच्या पोटात ढवळून येत असणारच. स्वाभाविकच आहे. त्यात पुन्हा खेडेकर म्हणतात, ब्राह्मणविरोधी कार्य सुरुच ठेवणार! तर मग भाजपाला कसे चालेल? असे विचारणारे भाजपाचे अंधभक्त किंवा आघाडीचे अंधभाट विसरतात भाजपाने काश्मीरात मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीशी केलेला राजकीय निकाह केला होता. सत्ता सहभागाचा मधुचंद्रही मांडीला मांडी लावून उपभोगला होता. त्यावेळी किंवा आताही अंधभक्त देशविरोधी फुत्कार टाकणाऱ्या मेहबुबांशी केलेली दोस्ती देशहितासाठीची चाल असल्याची चाणक्य नीती पटवून देत होते, देत असतात. संभाजी ब्रिगेड ही पीडीपीसारखी देशद्रोही नक्कीच नाही. तसेच पुरुषोत्तम खेडेकरांची ब्राह्मणविरोधी भूमिका ऐन भरात असतानाही त्यांच्या पत्नीला, रेखाताईंना उमेदवारी देण्यात भाजपाने गैर मानले नव्हते, हे विसरता येणार नाही!
नेमकं काय घडेल?
पुरुषोत्तम खेडेकरांनी सांगितले म्हणून लगेच भाजपा संभाजी ब्रिगेड युती होईलच असेही नाही. पण एक मात्र घडेल. आतापर्यंत वापरून घेतली जाणारी आणि मग केस अंगावर घेऊन जीवन घालवणारे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व्यावहारिक राजकारण करतील. डोके भडकावून नाही तर डोकं वापरून आपले, समाजाचे हित साधणारे राजकारण करतील. वैचारिकता आवश्यकच. पण उगाचच वैचारिकतेचे ओझे वाहण्यातही अतिरेक होतो, तेव्हा नुकसानच होते. खेडेकरांच्या व्यवहारवादी भूमिकेमुळे आता भाजपाशी युती होवो न होवो, पण किमान आमचा वाटा किती, असा प्रश्न विचारण्याइतके तरी संभाजी ब्रिगेडचे त्यांचे कार्यकर्ते व्यावहारिक होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच आघाडीचे नेतेही मापात पाप न करता या कार्यकर्त्यांना फक्त खेळवत न ठेवता सत्तेत सन्मानाने वाटेकरी करतील, एवढं तरी झालं तरी खूप. समाज, पक्ष, संघटना कोणत्याही असो, सामान्य कार्यकर्त्यांनी वापरलं जाऊ नये. त्यांना त्यांच्या हक्काचे मिळावे, यामताचा मी आहे. त्यामुळे खेडेकरांनी भाजपा हाच अंतिम पर्याय मांडून सामान्य कार्यकर्त्यांनाच एक वेगळी दिशा दाखवली असे म्हटले तर वावगे ठरू नये. मग ते डावे असो वा उजवे. डावं-उजवं न करता प्रत्येकालाच सत्तेचा वाटा मिळावा, एवढीच अपेक्षा!
तुळशीदास भोईटे मुक्तपीठ मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite