तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा मुद्द्यावरून संघर्ष पेटताना दिसत आहे. निमित्त मनसेचे नेते राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना केलेल्या त्यांच्या लिखाणाच्या समर्थनाचे.
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली, “राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे”, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
“हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की”, असेही प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यानंतर स्वाभाविकच मनसेकडून प्रतिक्रिया आली. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी गायकवाडांना धमकी दिली आहे. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचीही प्रतिक्रिया आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपाला स्वत: शरद पवार यांनी उत्तर दिलं, “राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला”.
राजकारणी, विद्वान यांचा दुटप्पीपणा उघड
गेले दोन दिवस राज ठाकरेंच्या विधानांवरून सुरु असलेल्या आक्रमक प्रतिक्रिया पाहून हसायला आलं. कारण या सर्व नेत्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात अढळ आणि आदराचं स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या सर्वांचं प्रेम कसं बेगडी आहे हे काही दिवसांपूर्वीच या सर्वांनी दाखवून दिले आहे. सर्वांनी म्हणजे सर्वांनी.
सामान्य मराठी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात. महाराजांचं नाव घेताच रक्त सळसळत नाही तो मराठी माणूस असूच शकत नाही. काही कळत नाही तेव्हापासून मराठी आई आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांच्या गोष्टी सांगते. त्यांचा आदर्श जिजाऊ मांसाहेबांसारखाच आपल्या लेकरांच्या मनात बिंबवते. त्यातूनच मराठी माणसाचं जीवन शिवछत्रपतींच्या जीवनातून प्रेरणा घेत आकारू लागतं. त्यासाठी अन्य कसली गरज नसते. ज्याचं जीवनच शिवप्रेरणेतून आकारतं त्या मराठी माणसाला मग आपलसं करण्यासाठी मतांचे सौदागर महाराजांचं नाव वापरून राजकारण करतात. महाराजांविषयी कुणी काहीही गैर उद्गार काढताच मराठी माणसांच्या भावना दुखावल्या जातात. नेमका याचाच वेळोवेळी फायदा घेतला जातो.
तरीही काही कपटी कावेबाज महाराजांच्या बदनामीची कपट कारस्थानं करतच असतात.
महाराजांच्या बदनामीचे कपटी डाव
जेम्स लेन प्रकरण हा विदेशी लेखकाकडून देशी विकृतांच्या मदतीनं फसफसलेला महाराजांच्या बदनामीचा डाव होता. त्याला विरोध झालाच पाहिजे होता. पण महाराजांना तसाच कमी लेखण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विद्वान संपादक गिरीश कुबेर यांच्या एका इंग्रजी पुस्तकाच्या माध्यमातून झाला, असा आरोप झाला. खूप संताप व्यक्त झाला. पण संताप व्यक्त करणारे सारे सामान्य शिवभक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर मतांसाठी नाही तर मनापासून प्रेम करणारे. श्रद्धा असणारे. त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड कुठे होते? दरवेळी भावना भडकवणाऱ्या मुद्द्यांवर बहुजन तरुणांना वापरून घेतलं जातं, आता तसं नको, अशी भूमिका तेव्हा मांडणारे इतरही आता का बरं चवताळून उठले? केवळ थातूर-मातूर चार ओळी पुढे करून त्यावेळी पार पाडला गेलेला सोपस्कार दाखवत आता कोणी आम्ही विरोध केला होता, असा आव आणू नये! प्रश्न हाच आहे की आताचा आकांत तेव्हा का नव्हता?
कुबेरांच्या पुस्तकाच्यावेळी का सारे शांत?
त्यावेळी जी भूमिका मांडली तीच आता मांडतो. महाराजांच्या बदनामीची लेनगिरी करणारे मग ते विदेशी असो किंवा देशी. न्याय एकच हवा. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गिरीश कुबेरांच्या पुस्तकाला ट्विटरवर ‘इंटरेस्टिंग’ म्हटल्यामुळे अनेकांचा स्वाभिमान सुट्टीवर गेला होता का?
प्रवीण गायकवाडच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेली शिवसेना, महाराजांच्या शिवमुद्रेचा झेंडा मिरवणारी मनसे, महाराजांच्या हवाल्यानं मत मागणारी भाजपा, लेनप्रकरणावर मतांचं राजकारण करून त्यावेळी सत्ता टिकवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही उत्तर द्यावंच लागेल. तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मतांसाठीच सोयीनुसार वापरता का?
प्रवीण गायकवाडच कशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सांगावेच, आता जसा तुम्ही राज ठाकरेंना प्रबोधनकारांचे लिखाण वाचण्याचा सल्ला दिला तसा कुबेरांना का दिला नाही? खासदार अमोल कोल्हेंच्या ट्विटचा हवाला देऊन जर राष्ट्रवादी बचावाचा प्रयत्न करणार असेल तर त्यांना ट्विटच्या पुढे विरोध नेण्यापासून कोणी रोखले तेही स्पष्ट केले जावे.
तसंच भाजपालाही सांगावं लागेल. कारण आमदार अतुल भातखळकर यांनी योग्य मुद्दे उपस्थित करत महाराजांच्या बदनामीच्या विषयाला वाचा फोडली होती. पण त्यानंतर तेही कोल्हेंसारखेच मौनात गेले. त्यांच्यावर पक्षातून दबाव आला का?
आपल्या त्यावेळच्या मौनावर इतरही अनेकांना स्पष्टीकरण द्यावंच लागेल. जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगत. काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि महाराजांच्या नावाने राजकारण, समाजकारण, इतिहास संशोधन, व्याख्यानं असं बरंच काही करत आपलं भलं करणाऱ्या प्रत्येकालाच. त्यात मग महाराजांमुळेच थाटात शतकमहोत्सवी वाढदिवस साजरा होण्याचं भाग्य लाभलेले बाबासाहेब पुरंदरेही आले. अपवाद वगळता सर्वच शांत होते. या सर्वांनीच सांगावं कुबेरांच्या पुस्तकावर घेतलेल्या आक्षेपाविषयी तुम्ही सारे गप्प का बसलात.
जर पुस्तकात तसं काही नाही तर तसेही स्पष्ट करा!
वाचक असल्याने गिरीश कुबेर यांच्या पुस्तकांचा मी स्वत: एक वाचक. त्यांचे लेखही वाचत आलो. हे पुस्तक मिळू शकले नाही. पण काही मित्रांनी पाठवलेली पानं खूप मनाला लागणारीच होती. पण पुस्तक स्वत: वाचलेलं नसल्यामुळे त्या पुस्तकाचा ‘इंटरेस्टिंग’ पुस्तक अशी प्रशंसा करणारे ट्विट करणाऱ्या सुप्रियाताईंना ट्विटरवरच विनंती केली. जर त्या पुस्तकात महाराजांविषयी आक्षेप घेतला गेला तसे काही नसेल तर तसेही स्पष्ट करा. पण तसे झाले नाही. त्यांनीच नाही आजवर ज्यांनी मौन साधलं आहे, त्यांच्यापैकी कुणीही माझ्यासारख्या सामान्य शिवप्रेमींच्या मनात जर पुस्तकाविषयी अज्ञानातून गैरसमज असतील तर ते दूर केले नाहीत. भीती एकच असते. अशी विद्वानांची पुस्तके काही वर्षांनी एखाद्या विद्यापीठात अभ्यासक्रमात लागू शकतात, संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जाऊ शकतात. विचार करा काय होईल मौन साधण्याच्या तुमच्या अविचारामुळे!
दुटप्पी सारेच!
त्या पुस्तकाच्या प्रकरणानंतर एक लक्षात आलं महाराष्ट्रात अनेकदा दुष्काळ असतो. मात्र गेल्या काही वर्षात दुटप्पीपणाचा नेहमीच सुकाळ असतो. आपले राजकीय नेते परवडले. ते उघड राजकारण करतात. पण काही सन्माननीय अपवाद वगळता इतरही अनेकांच्या गळ्यात राजकीय, आर्थिक वगैरे निष्ठांचे गळपट्टे असतात. ते दिसत नाहीत. किमान डोळ्यांनी तरी. विषय कितीही महत्वाचा असू द्या. जर पट्टा सैल सोडला गेला तरच ते सरसावतात. नाहीतर गुमान गप्प राहतात. मग त्यावेळी इतर फालतू युक्तिवाद केले जातात. मौनाच्या समर्थनासाठी खूप काही बोलतात. पण मग काळ हा सूड उगवतो. उघडं पाडतोच पाडतो. मुखवटे त्यांच्याच दुटप्पीपणामुळे टरकावले जातात. खरे भेसूर स्वार्थी चेहरे उघड होतात.
वाईट वाटतं. पण घडतंय तसं. आणि बिघडतंयही.
आज जे पेराल तेच उद्या उगवतं, याची जाण प्रत्येकानेच ठेवावी.