तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
उत्तरप्रदेशातील लखीमपूरमध्ये जे घडलं, ते जे करू शकतात ते सामान्य भारतीय असूच शकत नाहीत. भारतात लोकशाही आहे. तुम्हाला पटो न पटो, आपल्या मागण्यांसाठी लढण्याचा अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. त्यामुळे लखीमपूरमधून निवडून गेलेल्या माजोर्ड्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांविरोधात निदर्शने करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार होता. त्यांनी शेतकऱ्यांना सरळ कऱण्याची धमकी देऊन तसेच आपल्या “आज मंत्री खासदार असलो तरी पूर्वायुष्यात कोण होतो…” त्याची आठवण देऊन शेतकऱ्यांना चिथावलेही होते. देशाचे गृहराज्यमंत्री असणारे हे महाशय भूतकाळात कुणीही असतील. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आव्हान स्वीकारत निदर्शने करण्यात गैर काहीच नव्हते. तो त्यांचा हक्कच होता. मात्र या माजोर्ड्या मंत्र्याच्या सुपर माजोर्ड्या मुलाने आशिष मिश्राने निदर्शक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. शेतकऱ्यांना चिरडले. त्यात चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
३ ऑक्टोबर २०२१आणि १३ एप्रिल १९१९!
ही घटना ३ ऑक्टोबर २०२१ला घडली. पण डोळ्यासमोर आला तो दिवस १३ एप्रिल १९१९चा. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित दिवस. खरंतर पवित्र बैसाखीचा दिवस होता. पीक हाती आल्यानंतर मोकळे झालेले शेतकरी पंजाबमधील अमृतसरमध्ये इंग्रजांच्या रौलेट अक्ट या काळ्या कायद्याविरोधात जमले होते. मोठ्या संख्येने जमले होते. जनरल डायर नावाच्या क्रूरकर्म्याने त्या नागरिकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले. चारशेपेक्षा जास्त भारतीयांचे बळी घेतले. स्त्री पुरुष मुले काही काही पाहिले नाही. जालियानावाला बागेतील विहीरीत पाण्यापेक्षा मृतदेह जास्त झाले. आजही तेथे गेल्यावर भिंतींवरील गोळ्यांची भोकं ह्रदयाला भोकं पाडतात. डायरच्याविरोधात मनात संताप उफाळतो. सज्जनपणाचा आव आणणाऱ्या ब्रिटिशांच्या जंटलमन मुखवट्याआडचा क्रूर चेहरा म्हणजे डायर दिसतो. पुढे विसाव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांनी क्षमा वगैरे मागितली.
तेव्हा रौलेट होता आता कृषि कायदे!
लखीमपूर खेरीत शेतकरी हत्याकांड घडवलं गेलं तेव्हा जालियानवाला हत्याकांडाची आठवण उगाच आली नाही. तारीख बदलली. जागा बदलली. तेव्हा रौलेट होता आता कृषि कायदे आहेत. निदर्शक तेच होते सामान्य भारतीय. हत्याकांड घडवणारे तेव्हा ब्रिटिश होते, आता भारतीय. पण मानसिकता तीच क्रूर जनरल डायरसारखीच. आपल्याला जे विरोध करतील त्यांना चिरडण्याची. त्यांना संपवण्याची. त्यामुळे लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवणाऱ्या आरोपीचे नाव आशिष मिश्रा असले तरी वृत्तीने ती अवलाद त्याच क्रूरकर्मा जनरल डायरची आहे. संताप तोच आहे मनात उफाळलेला.
सौमय्यांना महाराष्ट्रात अडवणं चुकीचंच, पण यूपीतलं कसं योग्य?
भाजपा नेते किरीट सोमय्या सध्या महाराष्ट्रातील आघाडी नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करत आहेत. माझ्यासारख्या स्वतंत्र वृत्तीच्या पत्रकाराला हे मंथन चांगलेच वाटते. पक्ष कोणताही असो कोणाचे घोटाळे, कोणीही बाहेर काढत असेल चर चांगलेच. आक्षेप असतो तो केवळ ठराविकांनाच लक्ष्य केले जाते त्याला आणि त्यासाठीच्या मुहूर्ताला! सध्या कोणत्याही पदावर नसलेले किरीट सोमय्या कुठेही जाऊ शकतात. त्यांना रोखले जाणे म्हणजे आघाडीचा अतिरेकच. सत्तेचा गैरवापरच. पण इथे सोमय्यांना रोखले तर हुकूमशाही आणि तिथे हत्याकांड झालेल्या ठिकाणी जाण्यापासून काँग्रेसच्या प्रियंका गांधी, समाजवादी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यापासून प्रत्येकाला रोखायचे, ही कोणती शाही?
जालियनवालानंतर अंताचा आरंभ…
जालियनवाला बाग हत्याकांडाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर सर्वात जास्त परिणाम करणारी घटना म्हणून ओळखली जाते. त्या घटनेनंतर भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरोधातील संताप वाढतच गेला. ते हत्याकांड हा भारतातील जुलमी ब्रिटिश राजवटीच्या अंताचा आरंभ असल्याचे मानले जाते. लखीमपूर हत्याकांडांनंतर सामान्यांच्या मनात असाच संताप भाजपा सत्तेविरोधात उफाळला तर आश्चर्य वाटायला नको. कृषि कायदे हवेत नको, त्यावर वेगळी मते-मतांतरे असू शकतात. पण कायदे हे ज्यांच्यासाठी आहेत त्यांनाच जर ते नुकसान करणारे वाटत असतील, तर त्यांच्याही मतांवर विचार झालाच पाहिजे. त्यांनाच समाजकंटक ठरवून चिरडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काहीतरी भानगड असल्याचा संशय वाढवण्यासारखे आहे. लखीमपूरमुळे लगेच देशातच काय उत्तरप्रदेशातही मोठा राजकीय बदल घडेल. भाजपा संपेल. असे नाही. तसे म्हणणार नाही. मात्र लखीमपूर शेतकरी हत्याकांड हे भाजपामधील माजोर्ड्या शेतकरीविरोधी प्रवृत्तींचा नाशाची सुरुवात ठरावी, नाहीतर त्या पक्षातील तसं नसणाऱ्या इतरांचेही काही खरे नाही.
हिंसाचाराचे समर्थन नाहीच!
शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर तिथं असणाऱ्या काहींनी संतापाने गाडीतील चौघांना मारले. त्यांचेही बळी जाणे पटणारे नाही. हिंसाचाराचं समर्थन होऊच शकत नाही. कदापि नाही. मात्र, एकप्रकारे निदर्शने करणाऱ्यांना त्या टोकाला जाण्यासाठी भाग पाडणारी अमानुषता ज्यांनी दाखवली त्यांचे पाप त्यामुळे कमी होत नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात असेच शेतकऱ्यांचे बळी गेले होते. त्यावेळी त्या सत्ताधाऱ्यांविरोधात जो संताप होता तोच आता शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या डायर प्रवृत्तीविरोधात आहे. असणारच. मावळची आठवण देऊन आताच्या पापाचे समर्थन केले जाऊ नये. ते झाल्यानंतर पुढे त्यांच्या सत्तेचे काय झाले तो भूतकाळ उलट लक्षात ठेवावा.
…तर आज नाही पण उद्या ओढवणाऱ्या अंताचा आरंभ ठरू शकतो!
१९१९मध्ये जनरल डायरने जे केले त्याबद्दल १९९७मध्ये राणी एलिझाबेथने जालियनवाला बागेतील स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. २०१३मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जालियानवाला बागेला भेट दिली. तेथे स्मारकातील पुस्तिकेत त्यांनी लिहिले “ब्रिटिश इतिहासात जालियनवाला बाग हत्याकांड एक लाजिरवाणी घटना होती.” भाजपाच्या नेत्यांनी हा इतिहास विसरू नये. सत्ता ही सदा सर्वकाळा कुणाची नसते. तुम्ही जर सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्याच्या गैरसमजात वावराल. शेतकऱ्यांना, सामान्यांना असं चिरडाल तर या घटना तुमच्या सत्तेच्या आज नाही तर उद्या ओढवणाऱ्या अंताचा आरंभ ठरू शकतात. इतिहास हेच भांडवल करत राहणाऱ्यांनी इतिहास विसरायचा नसतो!
(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite
उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…