तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे नेमकं पुढचं पाऊल काय उचलतील, हे अद्याप स्पष्ट नाही. पण त्यांनी उचललेलं पाऊल अनपेक्षित होतं असं मात्र म्हणता येणार नाही. शिवसेनेतील दरबारी राजकारण्यांमुळे त्यांची अस्वस्थता सातत्यानं वाढत असल्याची चर्चा गेले काही दिवस शिवसेनेत सुरु होती. त्यांच्या अस्वस्थतेच्या अनेक कारणांची सध्या शिवसेनेत चर्चा सुरु आहे.
शिवसेनेच्या नव्या सत्ता समीकरणामुळे एकनाथ शिंदेंचं नुकसान
- शिवसेना नेते एकनाथ शिंदे २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर अस्वस्थ होते.
- शिवसेना भाजपा युती सत्तेवर आली असती तर एकनाथ शिंदेंना महत्वाच्या खात्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती.
- मात्र, शिवसेनेने वेगळी वाट चालल्यानंतर भले मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आलं, पण उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, महत्वाची खाती शिवसेनेच्या तुलनेत कमी आमदार असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली.
- त्यामुळे शिवसेनेच्या अनेक महत्वाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, त्यात एकनाथ शिंदेही होते.
- त्यातही शिवसेनेच्या अनेक आमदारांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करुन झाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थखाते असल्यानं त्यांची विकास कामांसाठी आर्थिक कोंडीही सुरु झाली.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर वारंवार तक्रारी करूनही काहीच बदल झाला नाही, त्यामुळे असंतोष खदखदत होता.
शिवसेनेत महत्वाची जबाबदारी नाही
- एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अगदीच मोजक्या नेत्यांपैकी आहेत, जे सातत्यानं पक्ष संघटनेसाठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात.
- सत्तेचे लाभार्थी झाल्यानंतर इतर आमदार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांना सत्तेचे लाभ मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असत.
- निवडणुकांमध्येच नाही तर इतर वेळीही ते सढळ हस्ते खर्च करत असतात.
- शिवसेना वैदयकीय कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गेली काही वर्षे महाराष्ट्रभर त्यांनी सेवाकार्य सुरु केले आहे.
- तरीही शिवसेनेत महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घेतलं जात नसल्यानं त्यांची अस्वस्थता वाढत होती.
- त्यातच राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणुकांमध्येही त्यांना दूर ठेवण्यात आलं.
- त्याचाच वचपा त्यांनी अपक्षांची मते फिरवून काढल्याचं मानलं जातं.
- ऐन राज्यसभा निवडणुकीचं राजकारण रंगत असताना त्यांच्यावर आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी टाकली गेली. त्यांनी संजय राऊतांसोबत अयोध्येला जावून दौरा यशस्वी करण्यात भूमिकाही बजावली.
एकनाथ शिंदेंच्या प्रभाव क्षेत्रात हस्तक्षेप
- एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सत्ताधारी आणि प्रभावशाली नेत्यांपैकी त्या मोजक्या नते नेते आहेत, ज्यांचे लोकांमध्येही काम आहे. लोकांमध्ये स्थान आहे.
- एकनाथ शिंदेंच्या प्रभावक्षेत्रातील जिल्ह्यांमध्येही अशा दरबारी राजकारण्यांकडून तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पोलीस आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांमध्ये होणार हस्तक्षेप त्यांना मान्य नव्हता.
- ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडील कामं करून घेण्यासाठी
पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांचा वाढलेला हस्तक्षेप
नगरविकास खात्यावर दरबारी नेत्याचा डोळा
- नेहमी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीकडे असणारं महत्वाचं नगर विकास खातं हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आलं.
- त्यातच नगरविकास खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या एमएमआरडीएमध्ये शिवसेनेच्या नव्या काही नेत्यांकडून होऊ लागलेला हस्तक्षेप एकनाथ शिंदे यांना खुपत होता.
- त्यांनी त्याविषयी नाराजीही बोलून दाखवली होती. त्याचा गैरफायदा घेत, त्या खात्यावरही दरबारी राजकारणी मंत्र्यांपैकी
एकाचा डोळा असल्याची शिवसेनेत चर्चा होती.
दरबारींविरोधातील नाराजीची उद्धव ठाकरेंनाही कल्पना!
लोकांमध्ये वावरत काम करणाऱ्यांपेक्षा कधीही लोकांमधून निवडून न आलेल्या शिवसेनेतील दरबारी राजकारण्यांविरोधातील नाराजीची कल्पना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही असल्याचा दावा शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातील घडामोडींच्या जाणकारांकडून केला जातो. त्यामुळेच त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये विधानपरिषदेच्या मागच्या दरवाजाने सत्तेत आलेल्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची पावलं उचलली आहेत. गेल्या सत्ताकाळापेक्षा यावेळी विधान परिषदेतून आलेले फक्त सुभाष देसाई आणि अनिल परबच सत्तेत आहेत. त्यांच्यातील सुभाष देसाईंना आता आमदार नसल्याने त्यांना त्यांचा हातखंडा असलेल्या पक्ष संघटनेच्या कामावर लक्ष देण्यासाठी मोकळे केले जाण्याची शक्यता आहे. पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत काहीशी दुर्लक्षाची भूमिका शिवसेनेला महाग पडण्याची शक्यता आहे.
अर्थात सर्वात महत्वाचं कारण महत्वाकांक्षाही!
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण झाली. काही दरबारी नेत्यांकडून जाणीवपूर्क निर्माणही केली गेली असेल. त्यातून एकनाथ शिंदेंची अस्वस्थता वाढली हेही खरे आहे. पण त्यातील एक महत्वाचा घटक विसरता येणार नाही, तो आहे एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षेचा. राजकारणी म्हटलं त्यातही लोकांमधील नेता म्हटलं की महत्वाकांक्षा असतेच असते. त्यातूनही इतर नेत्यांना ते धोकादायक वाटत असतात. अगदी स्वपक्षातील वरिष्ठांनाही ती महत्वाकांक्षा खुपतंही असते. इतर राजकीय पक्षांमध्येही अशा महत्वाकांक्षी नेत्यांची कोंडी केली जाते. भाजपामधील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे अशा, राष्ट्रवादीतील छगन भुजबळ, शिवसेनेतील राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांच्या उदाहरणांमधून ते दिसून येतं. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही तसंच घडत असावं. गेल्या काही वर्षात एकनाथ शिंदे यांची सत्तेच्या राजकारणातील महत्वाकांक्षा वाढती होती. त्यात त्यांना कुरवाळत शांत करण्याची यंत्रणा शिवसेनेच्या कार्यपद्धतीत नाही. अशांची उपेक्षा करणं म्हणजे त्यांना अधिकच चिथावणे. शिवसेना नेतृत्वानं अशा महत्वांकाक्षी नेत्यांना फक्त लगाम घालून काही होत नसतं हे ओळखत त्यांना कुरवाळत, त्यांच्या कलानं नाही पण न दुखावणारी कार्यपद्धती स्वीकारत पुढची वाटचाल केली तरी भविष्यात एखादे एकनिष्ठ शिंदे अस्वस्थतेतून वेगळ्या वाटेवर जाण्याचा विचारही करणार नाही…
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
संपर्क ट्विटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961