तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातून आघाडी सरकारवर त्यातही खरंतर शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना खोटे ठरवले. मीच त्या संवादात होतो. तसं काही बोलणं झालंच नव्हतं. एवढंच ते बोलले नाहीत तर जर तसं बोलणं झालेलं तर मग तुमचा फोटो मोदींपेक्षा एक चतुर्थांशच एवढा लहान का असा वेगळाच प्रश्नही त्यांनी विचारला! ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढले, त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले. घात केला असेही म्हटले.
शिवसेनेवर, ठाकरेंवर अमित शाह यांनी केलेल्या खोटेपणाच्या, सत्तालोभाच्या आरोपांवर आघाडीचे नेते बोलत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा त्याच मुद्द्यांवर नको. तसाही गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि हिंदुत्व हे चर्चेचे विषय झाले असल्याने त्यावर मत मांडणं आवश्यक आहे.
हिंदू आणि हिंदुत्व हे सध्या चर्चेचे विषय झाले आहेत. खरंतर सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले तसे असेल तर हिंदुत्व शब्द हा गुरु नानकजींनी सर्वात आधी वापरला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपर्यंत ज्यांनी ज्यांनी तो वापरला त्या प्रत्येकाचं हिंदुत्व हे त्यांच्या त्यांच्या शैलीतील होतं. आहे. आता राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदुत्व असे दोन वेगळे घटक मांडत एक वेगळा प्रयत्न केला आहे. त्यापेक्षा त्यांनी राजकीय हिंदुत्व म्हटलं असतं तर अधिक योग्य झालं असतं. अर्थात तरीही त्यांचा तो प्रयत्न केवळ भाजपाच्याच नाही तर त्यांच्यासोबतच्या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनाही अस्वस्थ करणारा ठरला.
हिंदू आणि हिंदुत्वाची अडचण तीच आहे. स्वत:ला हिंदू किंवा हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्याही अनेकांना ते अनेकदा अडचणीचे वाटते. २०१४मध्ये निर्विवाद स्वबळ मिळण्यापूर्वीपर्यंत भाजपाही सोयीनुसार हिंदुत्व एखाद्या उपरण्यासारखं सोयीनुसार वापरत असे. मग तो एनडीएचा प्रयोग असो किंवा काही प्रादेशिक पक्षांसोबतची दोस्ती. २०१४नंतरही तशी अडचण दिसली, ती काश्मिरात मेहबुबा मुफ्तींशी सत्तेची दोस्ती करताना! पण तोही काळ संपला.
आता केवळ काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी आघाडी केल्यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाशी गद्दारी केली, हिंदुत्वाशी तडजोड केली, असा आरोप करताना थोड्या हिंदुत्वाच्या राजकारणाचाही वेध घेणे आवश्यक आहे.
एनडीए-यूपीए काळापासूनच नाही तर त्याही आधी आणीबाणीविरोधात जनसंघी-समाजवादी-फुटीर काँग्रेसी जनता पार्टीत एकत्र आले (नंतर फुटले ते फुटले तरीही!) तेव्हापासूनच खरंतर देशातील राजकारणात डावे उजवे मधले असे भेद फार उरले असे नव्हते. दाखवण्यासाठी ते पाळले जात असले तरी ते दाखवण्यापुरते. त्यामुळे व्ही.पी.सिंहांना सरकार बनवण्यात पाठिंबा देणे भाजपाला नको वाटले नाही आणि तो घेणे त्यांनाही. तसेच महाराष्ट्रातही धर्मनिरपेक्ष शरद पवारांना समाजवाद्यांप्रमाणेच जनसंघी पुलोदमध्ये चालले आणि जनसंघींना सत्तेची चव चाखू प्रथमच चाखू देणारे नेते हे शरद पवार चालून गेले!
अर्थात शिवसेनेही अशी वेगळी मैत्री पहिल्यांदाच केली असं नाही. स्थापनेनंतर शिवसेनेची पहिली युती झालेली ती प्रजा समाजवाद्यांशी! ज्यांनी पुढे शिवसेनेला हुकूमशाही वगैरे शब्द वापरत टीका केली तेच समाजवादी! तेच समाजवादी ज्यांना शिवसेनेनेही लक्ष्य केले!! काँग्रेस आणि शिवसेनेशी मैत्री तर सर्वश्रूतच. वसंतराव नाईकांवर सर्व थांबतात. पण तथाकथित धर्म-जात निरपेक्ष काँग्रेस नेत्यांनी जेव्हा महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव अब्दूल रहमान अंतुले या मुसलमान समाजातील मुख्यमंत्र्याला विरोध केला. बदनाम करून संपवले. तेव्हा प्रत्येक टप्प्यावर शिवसेना आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत मैत्रीखातर ठाम राहिले. अगदी लार्जर दॅन लाइफ होऊ पाहणाऱ्या त्या तडफदार नेत्याला इंदिराजींच्या आदेशाने राजीनामा द्यावा लागला, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना रोखू पाहिले. शिवसेनेला विधान परिषद सदस्यत्वाचा फायदाही झाला. एकदा तर शिवसेनेने थेट मुस्लिम लीगशीही दोस्ती केली होती. एकूणच शिवसेनाही एक राजकीय पक्षच आहे. संघटना ते पक्ष या प्रवासात शिवसेनेनेही अनेकदा अशी अनेकदा रंगसंगती साधली!
भाजपाने तर ईशान्य, दक्षिण, काश्मीरातील मेहबुबा मुफ्तींचा पीडीपी अशा इतर अनेक एवढ्या तडजोडी केल्या की हिंदुत्वाचं सोवळंपण कधीच उरलं नाही. पण तरीही मागे वळून पाहिलं तर १९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीचे वेगळेपण होते, कारण हिंदुत्वावर अधिकृत लढवली गेलेली ती देशातील पहिली निवडणूक होती. त्यामुळे तिथं हिंदुत्ववादी हे हिंदुत्ववादी भूमिका मांडणाऱ्यांसोबतच असणे योग्य होते. जे विहिंप, संघ यांनी केले. पण भाजपाने काय केलं?
राजकारणातील हिंदुत्वासाठी किंवा हिंदुत्वाच्या राजकारणासाठी सर्वात महत्वाचं वर्ष होतं ते १९८७चंच होतं. त्याचवर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या विलेपार्ले मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेने ती निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढायचं जाहीर केलं. त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रभाकर कुंटे होते. जनता दलाचे प्राणलाल व्होरा होते. भाजपाने त्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. तुम्हाला वाटेल, भाजपाचा उमेदवार नव्हता पण हिंदुत्वाचा मुद्दा असल्याने त्या पक्षाचा स्वाभाविकच पाठिंबा हा शिवसेना उमेदवार डॉ. रमेश प्रभू यांना असेल. पण तसे झाले नाही. झाले भलतेच. भाजपाने पाठिंबा दिला तो जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना!
लक्षात घ्या. ती निवडणूक साधी सुधी नव्हती. भारताच्या इतिहासातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर थेट लढवली गेलेली पहिली निवडणूक होती ती. मात्र, भाजपाने हिंदुत्वाचा मुद्दा निवडणुकीच्या रणभूमीत वापरणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिला नाही. भाजपा कडवट धर्मनिरपेक्षतावादी प्राणलाल व्होरांसोबत राहिली.
त्या ऐतिहासिक निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेचे रमेश मेहतांसह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, संघाचे स्वयंसेवक एवढेच नव्हे तर गुजरातेतील संतही शिवसेनेच्या बाजूने मैदानात उतरले होते. निकाल लागला. शिवसेना जिंकली. पुढे हिंदुत्वावर प्रचार केल्याने डॉ. रमेश प्रभूंचे पदही गेले. (पुढे शिवसेनेचे आणखीही काही आमदार हिंदुत्व प्रचाराच्या मुद्द्यावर बाद झाले. पुढेही सुभाष देसाई, सुर्यकांत महाडिकांचे पद गेले. तेच नाहीत तर दिवंगत बाळासाहेब ठाकरेही अपात्र ठरले. मताधिकारही गेला होता.) पण तेव्हापासून देशाच्या निवडणुकीच्या राजकारणात हिंदु्त्व हा ही परवलीचा शब्द ठरला. भाजपाने कदाचित या निवडणुकीकडे एखाद्या लिटमस टेस्टसारखं पाहिलं असावं. कारण त्यांनी त्याचं यश १९८७मध्ये पाहिलं आणि त्यानंतर ते मुद्दे निवडणुकीच्या अजेंड्यात आले.
पण जर शिवसेनेने हिंदुत्ववादी नसणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणे, ही हिंदुत्वाशी तडजोड असेल, तर १९८७च्या देशातील पहिल्या हिंदुत्वावरील निवडणुकीत भाजपाने हिंदुत्वावर लढणाऱ्या शिवसेनेला विरोध करत धर्मनिरपेक्षतावादी जनता दलाला पाठिंबा देणे ही तर ऐतिहासिक घोडचूकच म्हणावी लागेल. चीन आक्रमणातील स्वागताची भूमिका ही डाव्यांची ऐतिहासिक चूक मानली जाते. तशीच भाजपाची १९८७ची पार्ल्यातील ऐतिहासिक चूक आहे. कारण जर भाजपाच्या बळावर लढणाऱ्या जनता दलाचा विजय झाला असता तर हिंदुत्वाच्या राजकारणाची भ्रूणहत्याच झाली असती. अंकूर उमलता उमलताच खुडला गेला असता. कदाचित हिंदुत्वावरील निवडणुकीत भगवा फडकल्यानं हिंदुत्व निवडणुकीत चालतं हे भाजपाच्या थिंक टँकला कळलं नसतं. मग पुढचे रथयात्रेसारखे आक्रमक हिंदुत्वाचे प्रयोगही कदाचित झाले नसते. अयोध्येतील राम मंदिरही साकारले गेले नसते. झांकीच नसती तर बाकीही काही नसतं. त्यामुळे राजकारणात हिंदुत्व चालतं की नाही हे दाखवणारी लिटमस टेस्ट म्हणता येईल अशा पार्ले निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला केलेला विरोध ही ऐतिहासिक घोडचूकच म्हणता येईल.
मुद्दा एवढाच की, १९८७मधील ऐतिहासिक निवडणुकीत हिंदुत्वाला विरोध करण्याच्या ऐतिहासिक चुकीबद्दल भाजपा आता तरी माफी मागणार का?
तुळशीदास भोईटे हे ‘मुक्तपीठ’ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत.
संपर्क – ट्वीटर @TulsidasBhoite मोबाइल 9833794961 ई-मेल tulsidasv@gmail.com