मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्याशी करण्यात आलेला घातपात म्हणजे टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण. पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या या तपासात अनेक गौप्यस्फोट होत आहे. आता झालेला गौप्यस्फोट परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आलेला तुकाराम सुपे हा कसा खलनायक होता हे दाखवणारा आहे. २०१८मध्येच हा घोटाळा उघडकीस येवून संपू शकला असता, पण सुपेनं तब्बल ३० लाख रुपये लाच खाऊन घोटाळा दाबला. ही लाच देणाऱ्या जीए टेक्नॉलॉजी या सॉफ्टवेअर कंपनीच्या शिवकुमारनंच तशी कबुली दिली आहे.
सुपेनं लाच खाल्ली, प्रकरणं दाबलं!
- टीईटी पेपरफुटी प्रकरणी जीए टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमारने परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेला तब्बल ३० लाख रूपये दिले.
- त्यानेच आता सुपेला लाच दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
- २०१८ मध्येच हे प्रकरण उघडकीला आले असते.
- पण तुकाराम सुपे याने ते दाबून टाकले, अशी माहिती शिवकुमारकडून बाहेर आली आहे.
- त्यामुळे तुकाराम सुपेच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागात नोकरीला…
- टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या ७ हजार ८८० जणांपैकी तब्बल १००३ अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात ३२३ अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे.
- अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे.
बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावरही सुपे मेहरबान!
- जळगावच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी ८१ बनावट प्रमाणपत्र दिले होते.
- तरीही तुकाराम सुपेनं काहीच कारवाई केली नाही.
- आता पोलीस तपासात सुपेचं पाप समोर आलं आहे.
- १६ फेब्रुवारीपर्यंत या प्रकरणाचा पोलीस तपास चालणार आहे.
- दरम्यान, पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या टीईटी गैरप्रकारातील घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचं समोर येत आहे.