मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध उद्योगपती व बजाज ऑटो उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पद्मभूषण राहुल बजाज यांच्या दुःखद निधनामुळे भारतीयांची उद्योग क्षेत्रातील अस्मिता, प्रतिभा, क्षमता आणि कल्पकता यांचे प्रतीक आपल्यातून निघून गेले आहे. ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर,हमारा बजाज’ या गीताप्रमाणे प्रत्येक भारतीयाला आपले वाटणाऱ्या बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग विशेषतः ऑटो उद्योग क्षेत्राने आपली ‘बुलंद तस्वीर’ गमावली आहे,अशी शोक संवेदना राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
गांधीवादी आजोबांच्या प्रेरणेने उद्योगासोबतच समाजसेवेचा वारसाही त्यांनी जपला. सत्तेत कुणीही असो आपला स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा जपून त्यांनी देशवासियांसमोर विशेषत: उद्योजकांसमोर एक आदर्श ठेवला आहे. “केंद्रात युपीए सरकार असताना आम्ही खुलेपणाने केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करू शकत होतो. मात्र देशात सध्या भीतीचे वातावरण असून केंद्रातील सरकारवर टीका केल्यास त्याकडे सकारत्मकतेने पाहिले जाईल असे वाटत नाही,” हे त्यांनी २ वर्षांपूर्वी केलेले वक्तव्य आजही देशातील स्थितीवर मार्मिक भाष्य करणारे आहे.
देश आज गंभीर आर्थिक संकटातून जात असताना उद्योग आणि आर्थिक क्षेत्राने बजाज यांचा हा आदर्श ठेवून आपले प्रश्न,अडीअडचणी निर्भिडपणे मांडणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असेही डॉ. नितीन राऊत म्हणाले.
“बजाज स्कुटर”च्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांचे दुचाकी घेण्याचे स्वप्न साकारणारे उद्योग क्षेत्रातील अध्वर्यू व्यक्तीमत्व देशाने गमावले, असेही ते म्हणाले.
राहुल बजाज यांनी ऑटो उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. तीन दशकांपूर्वी मध्यमवर्गीय लोकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी ‘बजाज स्कुटर’ची निर्मिती केली. हमारा बजाज ही बजाज कंपनीची टॅग लाईन देशातील नागरिकांच्या मनात आजही घर करून आहे. बजाज उद्योग समुहाच्या दुचाकींना ग्राहकांची पहिली पसंती होती. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी काम केले.
राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष या नात्याने राहुल बजाज यांनी गेली ४० वर्षे आपल्या कुटुंबीयांचा समृद्ध वारसा सांभाळला. प्रकृती अस्वास्थ्य आणि वृद्धापकाळामुळे त्यांनी गेल्यावर्षीच अध्यक्षपद सोडले होते.
बजाज फायनान्स व बजाज फिनसर्व या वित्तीय कंपन्या स्थापन करून त्यांनी ग्राहकांना वाहन व गृह कर्ज उपलब्ध करून दिले.