मुक्तपीठ टीम
पालघरमधील जव्हार येथे एका ३५ वर्षीय आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रेखा पोटिंगा असे या महिलेचे नाव आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. महिलेला नाशिक रुग्णालयात उपचारासाठी नेले जात असतानाच तिचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यात सहा वर्षांनंतरही जिल्हा रुग्णालय नाही. त्यामुळे तेथे असलेल्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेसारख्या काही सामाजिक संस्थांच्या रुग्णालयांचा अपवाद वगळता पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना एकतर मुंबई, ठाणे, नाशिक किंवा शेजारच्या गुजरात राज्यात न्यावे लागते.
पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील धाबेरी येथिल ३५ वर्षीय रहिवासी रेखा पोटिंगा नावाच्या आदिवासी गर्भवती महिलेला शनिवारी दुपारी प्रसूती वेदना सुरु झाल्या, त्यानंतर तिला प्रथम साखरशेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना पतंगशाह मेडिकल कॉलेजमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तेथून सायंकाळी तिला नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले जात होते मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास बाळाने महिलेच्या पोटातच जीव सोडला. मृतदेह जव्हार येथे नेण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. सामाजिक कार्यकर्त्या सीता घाटाळ यांच्या मध्यस्थीनंतर त्यांचे पार्थिव जव्हारला परत नेण्यात आले.