मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाठतं असल्याचं दिसून येत आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी लॉकडाऊनबाबत अफवा देखील पसरत आहेत. सांगलीत व्यापारीच लॉकडाऊनची अफवा पसरवून शेतीमालाचे दर पाडले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या सर्वाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
राज्यातील काही भागांत कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी, जिल्ह्यात अद्याप तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. तरीही , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी भीती घालून द्राक्ष, भाजीपाला उत्पादक यांच्या मालाचे दर व्यापारी पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचे कोणतेही नियोजन नाही . त्यामुळे लॉकडाऊनच्या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिला आहे .
सध्या सांगली जिल्ह्यात द्राक्ष पीक जोरात आहे. या भागातील द्राक्षांना देशाच्या विविध भागात मागणी आहे तसेच परदेशातही निर्यातही सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांनी आंदोलनाची भीती घालून द्राक्षाचा दर कमी केला. आता करोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची भीती घालून आणखी दर कमी करण्याचे प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहेत. दोन वर्षात आलेला महापूर आणि अवकाळी पाऊस यातून सावरत असतानाच आता कमी दराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून असे दर पाडल्यास कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
एकीकडे स्थानिक बाजारपेठेत द्राक्ष उत्पादनाला मागणी चांगली असली तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही. करोनामुळे पुन्हा लॉकडाऊनची भीती घालून व्यापारी दर पाडत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी हा इशारा दिला आहे.