मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ५६ वा दिवस आहे. आता शेतकरी संघटना २६ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडची रणनिती ठरवत आहेत. शेतकरी नेत्यांचा भर ही परेड शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यावर आहे.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेडसाठी आवाहन करतानाच शिस्त पाळण्यासही बजावले जात आहे. शेतकरी नेत्यांनी संयुक्त किसान मोर्चाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आंदोलकांना केले आहे. तर दुसरीकडे, ट्रॅक्टर मोर्चासाठी २५ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती आंदोलनाच्या ठिकाणी फिरत समितीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल सर्वांना माहिती देत आहे.
तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारीचा ट्रॅक्टर परेड काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रॅक्टर परेड दिल्लीतील आउटर रिंग रोडमधून बाहेर काढला जाईल, असा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे.
ठरल्याप्रमाणे, शेतकरी आंदोलनाच्या संपूर्ण व्यवस्थापनेची जबाबदारी तरुणांनी आपल्या हाती घेतली आहे. तसेच २५ जानेवारीपर्यंत दररोज तालीम करून किरकोळ चुका दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परेडमधील काही ट्रॅक्टर महिला चालवतील असा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे.