मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या भीतीच्या सावटातून भारत मुक्त होत असतानाच केरळमध्ये नव्या आजाराचा प्रादूर्भाव सुरु झाला आहे. टोमॅटो फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. याची लागण प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये दिसत आहे. त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी कसोशीने प्रयत्न घेतले जात आहेत. लहान मुलांना ग्रासणाऱ्या या आजाराची कारणं, लक्षणं आणि सुरक्षेचे उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न…
टोमॅटो फ्लूची लागण होण्यामागील कारणं?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, टोमॅटो फ्लूबद्दल अजून फारशी माहिती मिळालेली नाही. यावर अभ्यास सुरू आहे. बहुतांशी पाच वर्षांखालील मुलांना याची लागण होण्याची जास्त भिती आहे.
त्याचवेळी केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, ‘हा आजार इतर मुलांपर्यंत पसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हे खूप संसर्गजन्य आहे. हा फ्लू पाणी, विष्ठा आणि इतर गोष्टी यांच्या थेट संपर्कातून पसरतो.
टोमॅटो फ्लू झाल्यावर आढळणारी लक्षणे
- डिहायड्रेशन
- त्वचेवर पुरळ उठणे.
- त्वचेला जळजळ किंवा खाज सुटणे.
- टोमॅटोसारखे लाल पुरळ
- उच्च ताप
- शरीर आणि सांधे दुखणे
- सुजलेले सांधे
- ओटीपोटात पेटके आणि वेदना
- मळमळ, उलट्या आणि अतिसार
- खोकला, शिंका येणे आणि सर्दी
- हाताच्या रंगात बदल
- कोरडे तोंड
- अति थकवा
काळजी घेतली तर लक्षणे नियंत्रणात!
‘टोमॅटो फ्लू हा सेल्फ-लिमिटिंग फ्लूचा प्रकार आहे, याचा अर्थ वेळीच योग्य काळजी घेतल्यास लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात. अशा परिस्थितीत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना हायड्रेटेड ठेवणे.
टॉमेटो फ्लूपासून कसं राहावं सुरक्षित?
- संसर्गित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल.
- फोड किंवा पुरळांवर खाज येण्यापासून मुलाला प्रतिबंधित करा.
- घर आणि मुलाच्या आजूबाजूला स्वच्छतेची काळजी घ्या.
- कोमट पाण्याने आंघोळ करावी
- संसर्गित मुलापासून अंतर ठेवा
- सकस आहार द्या
- याप्रकारची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.