मुक्तपीठ टीम
अचानक राज्यातील टॅामेटो दर कोसल्यामुळे राज्या्तील टॅामेटो उत्पादक शेतकरी हे अत्यंत संकटात सापडले आहेत. आणि दिनवाणी अशा प्रकारच्या अवस्थेत जाऊन पोहोचले आहेत. या शेतकऱ्यांना सरकारने त्वरित दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेचे नेते कॉ. अजित नवले यांनी केली आहे. ती पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
लाखो रुपये खर्च केलेला टॅामेटो रस्त्यांवर ओढयानाल्यांवर आणि बांधांवर फेकून देण्याची वेळ ही टॅामेटो उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक कुणाचाही ह्या प्रश्नाकडे लक्ष नाही. मान अपमान एकमेकांवर चिखल फेक यातच हे सर्व राजकरणी आज मश्गुल आहेत.
शेतकऱ्यांबद्दल कोणालाही आस्था नाही आणि त्यामुळे मोठया प्रमाणात असंतोष हा शेतक-यांमध्ये खदखदतो आहे. राज्य सरकारला आम्ही विनंती करतो आहे की, हो खेळखंडोबा आता कृपा करुन थांबवावा. टॅामेटो उत्पादक शेतकऱ्याला कशाप्रकारे दिलासा देता येईल यासाठी सहकार विभाग आणि पणन विभाग आणि कृषी विभागाने एकत्र यावं. तसेच कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून हा भाग साठवता येईल का? कर्ज देता येईल का? अनुदान देऊन शेतक-यांना दिलासा देता येईल का? आणि प्रक्रिया उद्योगाला बरोबर घेत हा जो नाशवंत शेतीमाल आहे ह्याच्या जतनासाठी काही उपाय करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल काही हस्तक्षेप करता येईल का? यासाठी गांभिर्याने पुढाकार घ्यावा.
शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आणि मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही सरकारच्या या तीनही विभागाकडून करतो आहोत. सरकारने जर हे केलं नाही तर प्रसंगी हा सगळा टॅामेटो शेतक-यांच्या वतीने राज्यसरकारच्या मंत्र्याच्या दारात आणि विरोधकांच्या दारात टाकण्याचं आंदोलन किसान सभेला घ्यावं लागेल, ती वेळ येऊ देऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. प्रसंगी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि अत्यंत तीव्र अशा प्रकारचा लढा देतील. अशा प्रकारचा इशारा सुध्दा किसान सभेच्या वतीने आम्ही देत आहोत.