मुक्तपीठ टीम
तिरुपती बालाजी दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लॉकडाऊनवेळी तिरुपती बालाजी मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, आता कोरोनाचे सावट कमी होत असताना तिरुमाला तिरुपती देवस्थानमने भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी सर्व दर्शन सुरू केल्या आहेत. भाविकांना मोफत दर्शन देण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमने १ नोव्हेंबर २०२२पासून टोकन सिस्टम परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
तिरुमाला तिरुपती देवस्थानम प्राधिकरणाने भुदेवी परिसरातून तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी मोफत टोकन देण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानुसार दररोज टोकन दिले जातील आणि भाविकांना भगवान व्यंकटेश्वरनाथाचे दर्शन घेता येणार आहे.
कशी असणार टोकन सिस्टम? जाणून घ्या
- तिरुपतीमधील भूदेवी, श्रीनिवासम आणि गोविंदराजस्वामी कॅम्पसमध्ये सर्व दर्शन टोकन जारी केले जातील.
- टोकनच्या संख्येबाबत, टीटीडीचे कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, शनिवार, रविवार, सोमवार आणि बुधवारी २० हजार-२५ हजार टोकन जारी केले जातील, तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी १५ हजार टोकन जारी केले जातील.
- सामान्य यात्रेकरूंची प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी ट्रस्ट बोर्डाने व्हीआयपी दर्शनाची वेळ बदलून सकाळी ८ वाजता करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अहवालात म्हटले आहे.