मुक्तपीठ टीम
काळ बदलला. आता नात्यांना काही महत्व नसतं. नव्या पिढीला नातेसंबंधांबद्दल म्हणावी तेवढी आपुलकी नसते. असे अनेकदा बोलले जाते, पण सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ आधुनिक काळातही श्रावणबाळांची परंपरा तशीच कायम असल्याचं दाखवून देणारा. कल्याणमधील एका लसीकरण केंद्रात एक तरुण त्याच्या आईला लसीकरणासाठी घेऊन आला. बहुधा तिला चालण्याचा त्रास होत असल्याने त्याने तिला हातांचा पाळणा करत आपुलकीनं उचलून आणलं. तेव्हा लसीकरणाची वेळ संपली होती. लसीकरण केंद्राचे आयोजक असणाऱ्या संकल्प प्रतिष्ठानचे सचिन कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी लसीकरणाच्या टीमसह निघालेली गाडी थांबवली. तो तरुण त्वरित आईला घेऊन तिथं गेला. त्याने आईचे लसीकरण करून घेतले.
त्या तरुणाच्या धावपळीला तिथं असणाऱ्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड केले. त्या तरुणाची मनला भिडलेली कहाणी सचिन कदम यांनी एका पोस्टमध्ये मांडली आहे, ती त्यांच्याच शब्दात वाचा:
मी पाहिलेला श्रावण बाळ…
श्रावण बाळाची कथा आपण अनेकदा ऐकली व वाचण्यात देखील आली. त्यातील श्रावण बाळाच्या व्यक्तिरेखेचा विचार करता, त्याचे आई-वडीलांवरील प्रेम व श्रद्धेमुळे तो समाजात आजदेखील आदर्श पुत्र म्हणून मानला जातो.
आजपर्यंत श्रावण बाळाबद्दल केवळ पोथी-पुराणातुन वाचून त्याचे कौतुक वाटत आलय. परंतु आज साक्षात एका श्रावण बाळाचं दर्शन घडलं. कोणत्याही प्रकारचा देखावा अथवा पब्लिसिटी न करता, आपल्या आई प्रती असलेले कर्तव्य पार पाडतांना आज हा श्रावणबाळ आमच्या संकल्प प्रतिष्ठानच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात अढळून आला. शारीरिकदृष्ट्या अधू असलेल्या आपल्या आईला उचलून हा श्रावण बाळ घरापासून शिबिराच्या ठिकाणी, तपासणी दरम्यान तसेच परत घरपर्यंत घेऊन जातांना दिसला. कोणत्याही प्रकारचा त्रास, त्रागा, थकवा अथवा काहीतरी महान कार्य करीत असल्याच्या अविर्भावाचा लवलेशही या श्रावण बाळाच्या चेहर्यावर नव्हता. जगात असे अनेक असतीलही, परंतु नजरेसमोर दिसलेल्याचे कौतुक नक्कीच व्हायला हवं. कारण समाजात कोणत्या प्रकारचे आदर्श निमार्ण करायचे हे आपल्यावरच निर्भर असतं.
धन्य ते आई-वडील आणि धन्य त्यांचा हा श्रावण बाळ…
पाहा व्हिडीओ: