मुक्तपीठ टीम
गोवंडी परिसरात प्रचंड दहशत असलेल्या तीन रेकॉर्डवरील वॉण्टेड आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. इरफान, मुनाफ दिवटे, सद्दाम मुस्तक हाश्मी ऊर्फ मच्छी आणि फैयाज नूरमोहम्मद शेख अशी या तिघांची नावे आहेत. यातील सद्दाम आणि फैयाजकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे आणि एक खंजीर हस्तगत केला आहे. या तिघांविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी आणि दंगलीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांनी सांगितले.
इरफान दिवटे याच्याविरुद्ध चार वर्षांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी १९५, १९७, ३०७, ५०६ (२), ५०४, ४२७, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती, मात्र तो चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. त्याचप्रमाणे सद्दाम हाश्मी आणि फैयाज शेख यांच्याविरुद्ध अशाच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, मात्र गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते, या तिघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यांत पोलिसांनी पाहिजे आरोपी म्हणून घोषित केले होते, अशा पाहिजे आरोपीविरोधात विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांना दिले होते, या आदेशानंतर या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सद्दाम आणि फैयाज हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून मुंब्रा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके व त्यांच्या पथकाच्या तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती, अखेर दोन दिवसांपूर्वी सद्दाम आणि फैयाज या दोघांना पोलिसांनी अटक केली.
त्यांच्या राहत्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे आणि एक खंजीर सापडला. या शस्त्रांचा ते दोघेही खंडणीसह इतर गुन्ह्यांसाठी वापर करीत होते. या दोघांच्या अटकेने विविध गुन्ह्यांत पाहिजे आरोपीच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, आता आपली सुटका नाही, पोलीस आपल्याला सोडणार नाही. त्यातून गेल्या काही वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या इरफान हा विशेष सत्र न्यायालयात हजर झाला, न्यायालयात त्याने आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाच्या एका गुन्ह्यांत अटक केली. पोलीस तपासात या तिघांविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दंगल, दरोडा आणि खंडणीच्या काही गुन्ह्यांची नोंद आहे, यातील बहुतांश गुन्ह्यांत ते वॉण्टेड आरोपी असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांनी सांगितले. या तिघांच्या अटकेने गोवंडी, शिवाजीनगर, बैगणवाडीतील स्थानिक रहिवाशांनी पोलिसांचे आभार मानले आहे.