मुक्तपीठ टीम
कोरोनावर लस हीच प्रभावी असून वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर मोफत लसीकरण मोहिम व्यापक प्रमाणात राबविणे हाच त्यावरचा उपाय आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांनी कोरोना लस मोफत दिली पाहिजे अशी मागणी केली असून काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे असे स्पष्ट करून महाराष्ट्रातही सर्वांना सरसकट मोफत कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने केली आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. मात्र, त्याचवेळी मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई अयोग्य असल्याच्या कानपिचक्याही थोरात यांनी आघाडीतील मित्र पक्षांना दिल्या आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे ती म्हणजे लस ही मोफतच दिली पाहिजे. याविषयी मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने मागणी केलेली असताना मोफत लसींवरून श्रेयाची लढाई सुरू होणे हे योग्य नाही, तसेच काँग्रेसला ते आवडलेले नाही. थोरातांनी मांडलेली ही भूमिका म्हणजे आघाडीतील मित्रपक्षांना कानपिचक्या असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकारचा लसीकरणाबद्दलची घोषणा स्वत:च करून टाकली. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचे ट्विट केले. काही वेळानंतर त्यांनी ती डिलीट केले. दुसरे सुधारित ट्विट केले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्याचा सरकारचा निर्णय इतरांनी जाहीर करुन टाकणे चुकीचे असल्यामुळेच महसूल मंत्री थोरात यांनी श्रेयवादाची लढाई अयोग्य असल्याच्या कानपिचक्या दिल्याचे मानले जाते.
केंद्र सरकारने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होईल याचे नियोजन केले पाहिजे. १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून कोरोना लस दिली जाणार आहे, या पार्श्वभूमीवर धोरण ठरवण्याची गरज आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देताना सुरुवातीला गर्दी झाली, गोंधळ झाला. १८ ते ४४ या वयोगटातील लोकसंख्या पाहता निश्चित धोरण जाहीर केले नाही तर गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांबरोबर याविषयी आपली चर्चा झाली असून दोन तीन दिवसात यासंदर्भात धोरण निश्चित होईल असेही थोरात म्हणाले.