मुक्तपीठ टीम
दक्षिण मुंबईतील प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी सरकार योजना आखत आहे. नरिमन पॉईंटला थेट कुलाबाला जोडण्यासाठी सागरी पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील दोन भागांदरम्यानच्या पाण्यावर १.६ किमी लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. हे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला म्हणजेच एमएमआरडीएला देण्यात आले आहे.
हा पूल नरिमन पॉईंटच्या एनसीपीएपासून सुरू होईल आणि कुलाबा फायर स्टेशनजवळ संपेल. हा पूल ४ लेनचा असून २ लेन नरिमन पॉईंटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आणि २ लेन कुलाबाच्या दिशेने जाणारे असतील. पुलाबरोबरच शहरातील रहदारी कमी करण्यासाठी सरकारने मुंबईत तिसरा सी लिंक तयार करण्याच्या पर्यायावर काम सुरू केले आहे. तसेच २०१० मध्ये वांद्रे ते वरळी दरम्यान ५.६ किमी लांबीचा सी लिंक सुरू झाला. वांद्रे ते वर्सोवा दरम्यान १७.७ किमी लांबीचा सी लिंकचे काम आता सुरू आहे. या पुलाचे काम सन २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून २०१९ मध्ये सुरू झाले आहे.
समुद्र मार्गावरील पूल तयार करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला म्हणजेच एमएमआरडीएला देण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी एमएमआरडीएने टेक्नो इकॉनॉमी फिजिबिलिटी स्टडीची तयारी सुरू केली आहे. या पुलाच्या कामासंदर्भातील सर्वेक्षणाचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
सदर पूलाच्या बांधण्यासाठी संरक्षण आणि पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. हा पूल नौदल आणि तटरक्षक दलाच्या अनेक महत्त्वाच्या तळांमधून जाणार आहे, त्यामुळे या विभागांकडून अडचणी येऊ शकतात. मुंबई मनपाकडून २०१९ पासून हा पूल बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु पुढे कोणतीही प्रगती न झाल्याने या प्रकल्पाचा प्रस्ताव तसाच पडून राहिला गेला. मात्र, यावेळी एमएमआरडीएने हे काम हाती घेतले आहे.
पाहा व्हिडीओ :