मुक्तपीठ टीम
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समिती म्हणजेच सीडब्ल्यूसीची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत नवा अध्यक्ष कोण? या मुद्द्यावर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका येत्या मे-जून महिन्यात घेतल्या जातील आणि यातच पक्षाचा नवा अध्यक्ष ही नेमला जाईल. तसेच आखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे प्लेनरी सत्र २९ मे ला आयोजित केले जाईल. बैठकीत दिल्ली शेतकरी आंदोलनावर आणि अर्णब गोस्वामी चॅट लिकवरही चर्चा करण्यात आली.
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला मंजुरी मिळाली. मात्र, पक्षाचे बहुतांश नेते, कर्यकर्ते यांचा राहुल गांधींनीच पुन्हा अध्यक्ष व्हावे याकडे कल आहे. तसेच काँग्रेसची सत्ता असलेल्या चार राज्यांचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि नारायणसामी हेही राहुल गांधीच अध्यक्ष व्हावेत याचे समर्थक आहेत.
एकीकडे राहुल गांधीनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची पक्षात बहुसंख्यांची इच्छा असताना दुसरीकडे पक्षाच्या नाराज नेत्यांमध्ये काँग्रेस संघटनेच्या निवडणुकीत उमेदवार उतरविण्याबद्दल चर्चा सुरू आहे. तसेच राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदासाठी मैदानात उतरले तर त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करायचा की नाही याचा निर्णयही ते नाराज नेते घेणार असल्याचे सागिंतले जात आहे.
काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सल्लागारांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशीलता आणि अहंकार दाखविला आहे. घाईघाईत तीन कृषी विषयक कायदे तयार करण्यात आले हे स्पष्ट झाले आहे. संसदेने हेतुपुरस्सर त्यांची चौकशी करण्याची संधी नाकारली, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
तसेच या बैठकीत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर ही सोनिया गांधी यांनी निशाणा साधला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा कशापद्धतीने वेशीवर टांगण्यात आला, याचे धक्कादायक उदाहण आपण पाहिले. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे, असे म्हणत त्यांनी गोस्वामींना टोला हाणला आहे.