मुक्तपीठ टीम
जानेवारी २०२१ मध्ये टेलीग्राम हा सर्वात जास्त डाऊनलोड केलेला नॉन-गेमिंग अॅप आहे. डेटा अॅनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवरच्या अहवालानुसार जानेवारी २०२१ मध्ये टेलीग्राम जगातील नंबर १ अॅप झाला आहे. नवीन व्हॉट्सअॅप पॉलिसीवरून झालेल्या वादाचा थेट फायदा टेलीग्रामला झाला आहे.
टेलीग्राम डाउनलोड करण्याचे सर्वाधिक प्रमाण हे भारतात २४ टक्के आहे. जानेवारीमध्ये या अॅपला ६.३ कोटीवेळा डाउनलोड करण्यात आले. भारतात १.५ कोटी नवीन यूजर्सनी टेलीग्राम डाउनलोड केला. जानेवारी २०२० च्या तुलनेत टेलीग्राम अॅप ३.८ पट जास्त डाउनलोड केला गेला आहे. लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नववर्षात आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरुन प्रचंड गदारोळ सुरू झाला. नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध सुरू असतानाच व्हॉट्सअॅपला चांगलाच फटका बसलाय. व्हॉटसअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स सिग्नल आणि टेलीग्राम सारख्या अॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत.
यामध्ये टेलीग्रामनंतर टिकटॉक, सिग्नल आणि फेसबुकचा क्रमांक लागतो. या यादीमध्ये व्हॉट्सअॅप पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी व्हॉट्सअॅप तिसऱ्या क्रमांकावर होता. जानेवारी २०२१ मध्ये डाऊनलोडच्या यादीत इंस्टाग्राम सहाव्या स्थानावर आहे, झूम सातव्या क्रमांकावर आहे, आठव्या क्रमांकावर एमएक्स टाका टॅक, नवव्या स्थानी स्नॅपचॅट आणि दहाव्या क्रमांकावर मेसेंजर आहे. भारतानंतर इंडोनेशियातील यूजर्सनी टेलीग्राम सर्वाधिक डाउनलोड केला आहे. दुसर्या क्रमांकावर असलेल्या टिकटॉक अॅपला जानेवारीत ६.२ कोटी डाउनलोड मिळाले.