नव्या वर्षात ५०,००० कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या लष्करी विमानांच्या खरेदीसाठी भारत तयारी करत आहे. ८३ स्वदेशी तेजस लढाऊ विमानांची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच टाटा-एअरबसच्या संयुक्त उपक्रमातून उत्पादन होणाऱ्या ५६ मध्यम मालवाहू विमानांसाठीही मागणी नोंदवली जाण्याची शक्यता आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ३७ हजार कोटी रुपये मुल्याच्या ८३ तेजस मार्क १ ए विमानांची खरेदी करण्यात येणार आहे. हा संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीशी झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असेल. ही लढाऊ विमानं तीन वर्षात ताब्यात येतील. भारतीय वायू सेनेने सुचवलेल्यानुसार तेजसमध्ये सुधारणा केल्या जातील.
टाटा-एअरबस संयुक्त उपक्रम ट्विन टर्बोप्रॉप सी -२९५ विमानांची निर्मिती करणार आहे. त्यासाठीही मागणी नोंदवण्यात आली आहे. यामुळे भारतीय खाजगी क्षेत्रातील कंपनी हवाई संरक्षण क्षेत्रात प्रथमच प्रवेश करणार आहे.
करार झाल्यानंतर दोन वर्षांत एअरबस प्रथम १६ विमानांचा पुरवठा करेल, तर उर्वरित ४० विमानांचं उत्पादन पुढील आठ वर्षांत भारतात केले जाईल. या दोन्ही प्रकल्पांना अंतिम मंजुरीसाठी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या समितीकडे पाठविण्यात आले आहे.
८३ सिंगल इंजिन तेजस लढाऊ विमानांचे करार करताना पूर्वीच्या खर्चाच्या तुलनेत सुमारे ५६,५०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.