सरळ-स्पष्ट / तुळशीदास भोईटे
आज सकाळीच शिक्षक भरती चळवळीतील संतोष मगर यांच्याशी बोलणे झाले. अमरावती जिल्ह्यातील सुमित केशवराव राऊत या शिक्षक तरुणाने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यामाध्यमातून सुमितच्या मित्राशी बोलणे झाले. त्याने जे सांगितले ते संतोष मगर जे बोलले ते विदारक वास्तव योग्य ठरवणारेच होते. संतोष मगर यांनी जे ट्विटमध्ये मांडले तेच मला सांगितले.
ते संतापाने बोलले, “आमच्या सुमितने आत्महत्या केलेली नाही. त्याची सरकारने हत्याच केली आहे. शिक्षण विभाग त्यासाठी दोषी आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांच्या खात्याने ही हत्या केली आहे. मुख्यमंत्रीमहोदय, वाझेप्रकरणातून मोकळे झाला असाल तर आता शिक्षकभरतीच्या प्रतीक्षेत असताना आत्महत्या केलेल्या सुमितच्या आत्महत्येकडे पाहा.”
@CMOMaharashtra वाजे प्रकरण झाले असेल तर शिक्षकभरती च्या प्रतीक्षेत असलेल्या
चि . सुमित केशवराव राऊत
मु. पोस्ट. पाळा ता. मोर्शी जिल्हा. अमरावती
MA ( English ) BEd या बेरोजगाराणी आत्महत्या केली, @VarshaEGaikwad आपल्या विभागाने केलेली एक प्रकारची हत्याच आहे.! @RahulGandhi pic.twitter.com/oa8oQKLJHa— डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@Mha_Teacher) March 19, 2021
सुमित केशवराव राऊत हा अमरावतीतील मोर्शी तालुक्यातील पाळा गावचा. त्याने बी.एड.ही केले होते. घरची शेती. वडिलांनी फार उमेदीने शिकवले. त्यासाठी कर्ज काढले. २०१६च्या दरम्याने ते गेले. २०१७ला सुमित बीएड झाला. घरच्यांना वाटले. लेक नोकरीला लागेल. घरची परिस्थिती बदलेल. पण नोकरी काही लागली नाही. तेव्हा भाजपा सत्तेत होती. आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी. दोघांचेही बोलणे विकास…विकास…विकास पण बेरोजगारांशी बोलले तर सारे जीवन तसेच भकास…भकास…भकासच!
त्याचा मित्र प्रवीण गुडदे यांनी सांगितले, सुमितने इंग्रजी भाषेतून एम.ए.ही केले होते. कोरोनाआधी तो आर आर लाहुटी कॉलेजात तासिका तत्वावर शिकवत असे. अमरावतीच्या विद्यापीठातून उत्तरपत्रिका पुनर्मुल्यांकन वगैरेही कामे मिळत. काही पैसे मिळत. जगता येत होतं. कोरोना संकटानंतर आता तेही बंद झाले. भलतीच टंचाई आली. सुमितने खूप प्रयत्न केले, पण म्हणावे तसे काम मिळत नव्हते. त्यात वडिलांनंतर कर्जाचा बोजा त्याच्यावरच आलेला. तसा तो निराश होणारा नव्हता. पण मनात अस्वस्थता वाढच असावी. हतबलतेने नैराश्य दाटले असावे. खरंतर अशावेळी समजवले पाहिजे. पण कळले नाही तर कोण समजवणार? जे मार्ग काढू शकतात ते आजचे असो की कालचे, सत्ताधारी दिरंगाईच करत राहतात. तीच जीवघेणी ठरते.
सुमितच नाही तर महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार शिक्षक निराशेच्या खाईत लोटले जात आहेत. सुमितचा मित्र म्हणाला, “शिक्षकांना कुणी मुलीही द्यायला तयार नाहीत. काही उपयोग नाही तुमच्या शिक्षणाचा. दहावी नापासांना दिलेली परवडली. पण तुम्हाला देऊन उपयोग नाही, असे हिणवतात.” हेच शेतकऱ्यांच्या तोंडी ऐकायला मिळतं. मुंबईत अवघ्या काही हजारात राबणाऱ्या शेतकरी पुत्रांना विचारले तर ते हेच सांगतात, काही गावांमध्ये शेतकरी सांगितले तर मुलगी देत नाही. कुठेतरी भले शिपायाची नोकरी असो मुलगी देतात. हे दारुण वास्तव तयार होऊ लागले आहे.
जे सुमितच्या मित्राने सांगितले तेच नगरच्या पाथर्डीच्या रणजीत आव्हाडही बोलला. रणजीत ऊस कामगाराचा मुलगा. जांभळी गावातील. भटक्या समाजातील. विखे पाटलांच्या प्रवरा साखर कारखान्यासाठी त्याचे आजोबा ऊस तोडायचे. त्याचे आई-वडिलही तेच काम करत असत. ४० वर्षे. मुलाला डीएडला प्रवेश मिळाला. वडिलांनी मांसाहार सोडून माळ घातली. आता मुलाचे जीवन घडू दे. विठुराया ऐकेलही, पण शिक्षण क्षेत्रातील सम्राट बडव्याचं काय करायचं? त्यांना तो विठ्ठल देतो ती सदबुद्धीही नको असते. मनाची कवाडंच घट्ट बंद केलेली असतात. स्वार्थाचा चिकटपणा फेविक्विकपेक्षाही मजबूत असतो. पुढे सांगतोच. आधी रणजीतचं ऐकू.
रणजीत सांगू लागला, “२०१०-२०११ला डीएड झालो. प्रयत्न करतो, पण काहीच होत नाही. नोकरी लागल्याशिवाय लग्न करणार नाही, असे घरच्यांना सांगितले. नोकरीही लागली नाही आणि आता नोकरी नाही तर लग्नही होत नाही. पुन्हा लग्न करायचे कसे. नोकरी पाहिजेच ना. त्यामुळे तसे करणेही पटत नाही.”
रणजीतला नोकरी मिळू शकली नसती असं नाही. प्रकल्पग्रस्त कोट्यातून गावच्या मुलांना लागल्या तशा वेगळ्या काही नोकऱ्या लागल्या असत्या. पण रणजीतच्या डोक्यात शिक्षक होऊन समाज सुधारण्याचे वेड. त्यामुळे त्याने इतर संधी नाकारल्या. आता त्यामुळे घरच्यांनीही बोलणे टाकले. तो म्हणतो, “माझे आई-वडिल मला ऊस तोडणीच्यावेळी इतर कामाचे जे पैसे येत त्यांच्या दहाच्या नोटा घडी घालून जपून ठेवत. साठवून महिन्याला दोन हजाराची मनीऑर्डर करत. नंतर ते घेणे लाजिरवाणे वाटले. त्यातच त्यांनी बोलणेही सोडले. कोरोना संकटात कुठेच काही नव्हते. आळंदीला माऊलींचे दर्शन घेतले जीवनात आई-वडिलांनी करु दिले नव्हते ते काबाडकष्ट सुरु केले. बिगारी काम. खूप नैराश्य यायचं. पण सावरलो. कष्टानं जगलो.”
ज्या डोक्यानं नव्या पिढीला ज्ञान द्यायचं, ते डोकं जगण्यासाठी सिमेंटची पोती वाहत. चार मजले चढावे लागत. मुकादम धड वागवत नसे. पण रणजीतने संघर्ष केला. आजही त्याचा निर्धार कायम आहे. शिक्षक होऊन नवी पिढी घडवायची. पण वय थांबत नसतं. ते उलटलं तर कसं शक्य होणार!
बीएड-डीएड कृती समितीचे संतोष मगर शिक्षकभरतीसाठी लढत असतात. ते म्हणाले, “शासनाच्या उदासिन धोरणामुळे शिक्षकांची नवी पिढी नैराश्यात लोटली जात आहे. आताचे सरकार संस्थाचालकांना धार्जिणे आहे. त्यामुळे त्यांना फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. सरकारने लवकर भरती करावी. पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी अनेक संस्था चालक प्रयत्न करीत आहे.”
अजून किती बेरोजगार शिक्षकांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहत आहेत, हे एकदा सांगा म्हणजे वरातीमागून घोडे न्हेता येतील तुम्हाला?
बेशरम राजकारणी, सगळे एकाच माळेचे मणी.— hemant87 (@hemantpopade) March 20, 2021
शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांना नेत्यांविषयी तर प्रचंड राग आहे. आमदार अरुण लाड, सतीश चव्हाण, विक्रम काळे हे पदवीधर आमदार खरंतर बीएड-डीएडधारकांच्या बाजूनेच बोलले पाहिजेत. पण ते संस्थाचालकांच्या बाजूने पवित्र पोर्टलच्याविरोधात का बोलतात? हा त्यांचा सवाल या आमदारांनी विचार करावा असाच.
🏴धिक्कार असो असल्या सरकारचा⚫
2017पासून सुरू असलेली अगदी तुटपुंज्या जागेची पवित्रपोर्टल शिक्षकभरती पूर्णत्वास जात नाहीये⚫एक पेशाने शिक्षक असणारा @VarshaEGaikwad शिक्षणमंत्री भरतीला न्याय देऊ शकत नाही,तर ह्या पेक्षा वेगळे दुर्दुव्य काय अशू शकते⚫ @CMOMaharashtra @RealBacchuKadu— Dhananjay Wani (@Dhananj05054938) March 20, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांची प्रतिमा संवेदनशील अशी. मनोहर जोशी सोडले तर त्यांच्या पक्षात कुणी शिक्षण सम्राट किंवा उद्योजक नसावे. त्यांनी तरी सम्राटांच्या नाही तर शिक्षकांच्या बाजूने विचार करावा. बेरोजगारांचा आकांत ऐकावा. मुंबईतील शिवसेना महाराष्ट्रभर पसरली ती प्रस्थापितांच्याविरोधातील भूमिकेमुळे. त्यांनी आघाडी धर्म पाळावा. पण सम्राटांचा दबाव झुगारावा. प्रस्थापितविरोधातून दाखवलेला ठाकरी बाणा या मुलांचे आणि त्यांचेही भले करणारा ठरेल. भाजपा कार्यकाळात झाले ते सर्व वाईटच असे नाही. तेही सत्तेत होतेच. त्यामुळे जर काही पारदर्शक व्यवस्था झाल्या असतील तर त्या दोष दूर करून चालू राहू द्यावा. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी आठवावा वारसा तो बाबासाहेबांचा. न्याय कुणाला द्यायचा? साथ कुणाला द्यायची ते ठरवावे. राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्याविषयी युवापिढीला एक आपुलकी जाणवते. ती कायम राखण्यासाठी त्यांनीही प्रसंगी स्पपक्षीयांना दुखावणारी युवाहिताची भूमिका घ्यावी. जर तुमच्याकडे सत्ता असूनही शिक्षकभरती शिक्षणसम्राटांच्या तालावरच होणार असेल तर त्याचा अर्थ तुम्ही सर्व त्यांचेच साथीदार. दिरंगाईसाठी जबाबदार. मग सुमितसारख्यांच्या आत्मह्त्या या हत्याच मानल्या तर त्याचेही दोषी तुम्हीच ठराल!
एक विनंती सर्वांनाच:
कृपया शिक्षक नेत्यांनीही सोबतच्या शिक्षकांना हिंमत द्यावी. काही वेगळे मार्ग दाखवावेत. आत्महत्येनं काहीच साध्य होणार नाही. कुटुंब बर्बाद होते. हे लक्षात आणून द्यावे. खूप आहे जीवनात करण्यासारखे हे समजवावे. नेतृत्व आणि संघटन हे फक्त संघर्षासाठी नसावे तर सावरण्यासाठीही असावे.
संतोष मगर सांगतात…पवित्र पोर्टल का पाहिजे?
- ज्यांनी अभियोग्यता उत्तीर्ण केली त्यांच्यापैकी दहा उमेदवारांची नावे पवित्र पोर्टलमार्फत रिकाम्या असलेल्या संस्थांकडे सुचवील जातात. त्यातूनच निवडावी लागतात.
- सरकारने पोर्टलमार्फत सुचवलेले अभियोग्यताधारकच घ्यावे लागत असल्यामुळे संस्थाचालकांना वशिलेबाजी, भ्रष्टाचार करता येत नाही. किंवा किमान प्रमाण तरी कमी होते.
- संस्थाचालक एका जागेसाठी २-३ उमेदवार नेमूण प्रत्येकाकडून १०-२० लाख रुपये घेतले जात असत. फुकट राबवले जात असे. जाते. पैसेही बुडवले जात असत. काहीवेळा संस्थाचालकांच्या नावावर दलाल गरजूंना गंडा घालायचे. पवित्रमुळे याला आळा बसत आहे.
(तुळशीदास भोईटे हे www.muktpeeth.com मुक्तपीठ या मुक्तमाध्यम उपक्रमाचे मुख्य संपादक आहेत. संपर्क ९८३३७९४९६१)