मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील कर्जत लोणावळा खंडाळा परिसरातील भिवपुरी इथं टाटांचा जलविद्युत प्रकल्प आहे. १९२२ मध्ये वीज निर्मिती सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पात सध्या एका वर्षभरात जवळपास ३०० मेगायुनिट्स वीज निर्मिती केली जाते. जी महाराष्ट्राची मोठी गरज भागवते. हा जलविद्युत प्रकल्प मुंबईच्या आयलॅंडिंग सिस्टिमला साहाय्य देतो. या प्रकल्पात ब्लॅक स्टार्ट क्षमता असल्याने कोणतीही आणीबाणी उद्भवल्यास बॅकअप ऊर्जा स्रोत म्हणून काम करतो. त्यामुळे मुंबईवर वीज संकट कोसळल्यास मदत होते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवाचं वर्ष आहे. त्याच वर्षी टाटा पॉवरच्या भिवपुरी जलविद्युत प्रकल्पाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत हा एक सुवर्णयोग मानला जात आहे. टाटा समुहाच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेमुळे या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात लक्षणीय योगदान प्रदान केले जाते. पुन्हा हे सारं गेले १०० वर्ष सुरु आहे. हा जलविद्युत प्रकल्प हा भारतातील एक सर्वात जुना वीज प्रकल्प आहे. टाटा पॉवरने महाराष्ट्रातील भिवपुरी येथील आपल्या जलविद्युत प्रकल्पाला १०० वर्षे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष आनंदोत्सव साजरा केला.
टाटा पॉवरचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हा भारतातील एक सर्वात जुना वीज प्रकल्प आहे. याठिकाणी सध्या दरवर्षी जवळपास ३०० मेगायुनिट्स वीज निर्मिती केली जाते. गेली १०० वर्षे हा प्रकल्प देशाला स्वच्छ ऊर्जा पुरवत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजऱ्या करण्यात येत असलेल्या आझादी का अमृत महोत्सवाच्या वर्षीच टाटा पॉवरच्या भिवपुरी जलविद्युत प्रकल्पाच्या सातत्यपूर्ण, उत्कृष्ट कामगिरीची १०० वर्षे पूर्ण होणे हा एक सुवर्णयोग म्हणता येईल. भारताला ऊर्जा प्रदान करून, देशातील संपूर्ण समाजाला सक्षम बनवण्यासाठी टाटा पॉवरकडून गेली १०० वर्षे केले जात असलेले प्रयत्न ठळकपणे दर्शवणारी अशी ही महत्त्वपूर्ण घटना आहे.
टाटा पॉवर कंपनीने भिवपुरी पॉवरहाऊस बांधण्याची सुरुवात १९१६ साली केली. महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या जवळ रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे काम १९२२ साली सुरु झाले आणि त्यावेळी त्याची संस्थापित क्षमता ४८ मेगावॅट होती, जी नंतर ७५ मेगावॅट इतकी वाढवण्यात आली, यामध्ये ७२ मेगावॅट क्षमतेच्या नवीन पॉवरहाऊसचा देखील समावेश आहे, ज्यात प्रत्येकी २४ मेगावॅटची तीन युनिट्स आहेत. भिवपुरी जलविद्युत प्रकल्पामध्ये ३ मेगावॅट क्षमतेचे टेलरेस पॉवरहाऊस देखील आहे ज्यामध्ये प्रत्येकी १.५ मेगावॅट क्षमतेची दोन युनिट्स आहेत. आता या प्रकल्पामधून मुंबई महानगरातील उद्योग व परवानाधारकांना ११० केव्ही ट्रान्समिशन लाईन्स ट्रान्समिट केल्या जातात.
हा महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवताना टाटा पॉवरचे सीईओ व एमडी डॉ. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “भिवपुरी जलविद्युत प्रकल्पाला १०० वर्षे पूर्ण होणे हा टाटा पॉवरमध्ये आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. या प्रकल्पामधून शुद्ध ऊर्जा पुरवठा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि २०३० सालापर्यंत ८०% शुद्ध व हरित ऊर्जा क्षमता साध्य करण्याचा व त्याद्वारे देशाच्या शुद्ध ऊर्जा उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्ये योगदान देण्याचा आमचा निर्धार आज या महत्त्वाच्या क्षणी अधिकच दृढ झाला आहे.”
खोपोली आणि भिरा यांच्यासह भिवपुरी प्रकल्प या क्षेत्रातील पहिल्या जलविद्युत प्रकल्पांपैकी असून यामध्ये महाराष्ट्रातील पश्चिम घाटांमधील मोठ्या जल संसाधनांचा उपयोग केला जातो. आज हे तीनही प्रकल्प मिळून मुंबईची आयलॅंडिंग सिस्टिम चालवतात, एखाद्या आणीबाणीमुळे मुंबई महानगराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास बॅकअप वीज स्रोत म्हणून उपयोगी ठरतात, घरांमध्ये इन्व्हर्टर आपल्याला ज्याप्रकारे उपयोगाला येतात त्याचप्रमाणे हे प्रकल्प मुंबई शहराचे बॅकअप विद्युत स्रोत आहेत.
भिवपुरी जलविद्युत प्रकल्पामध्ये निर्माण केली जाणारी ऊर्जा शुद्ध व स्वस्त देखील असल्याने मुंबई या जगातील एका सर्वात व्यस्त व भरपूर लोकसंख्या असलेल्या शहरातील प्रदूषण कमी करण्यात मदत होते.
खोपोली, भिरा हायडेल प्लांट्ससह भिवपुरी जलविद्युत प्रकल्पातून सोडले जाणारे पाणी कोकण भागातील उल्हास, पाताळगंगा व कुंडलिका नद्यांना जाऊन मिळते. या पाण्यामुळे कर्जत, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, बदलापूर, मीरा-भायंदर, वसई इत्यादी भागांमध्ये औद्योगिकीकरण, शहरीकरण, सिंचन विकास, व्यापार-उद्योगधंदे विकासाचा वेग वाढला आहे.
भिवपुरी जलविद्युत प्रकल्पाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये गेल्या १०० वर्षात टाटा पॉवरने आर्थिक व सामाजिक विकासाच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहयोग प्रदान केला आहे. वंचित समुदायांमधील महिलांच्या रोजगाराला मदतीचा हात देण्यासाठी धागा केंद्रांची स्थापना, औषधी वनस्पतींपासून आरोग्यदायी उत्पादने बनवण्यासाठी ग्रामीण महिलांना प्रशिक्षण देणे, शैक्षणिक कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उत्कृष्टता योजना राबवणे, जैवविविधता व पर्यावरण याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देणे, पाणी व शुद्ध ऊर्जा योजना चालवणे अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. रोजगार निर्मितीसाठी टाटा पॉवरने विविध उपक्रम चालवले आहेत तसेच दुर्गम भागांतील गावांना प्राथमिक आरोग्यसेवा पुरवण्यासाठी विविध आरोग्य कार्यक्रम सुरु केले आहेत. टाटा पॉवरच्या या उपक्रमांमुळे संबंधित समुदायांना विकासाच्या संधी उपलब्ध झाल्या, इतकेच नव्हे तर ते समुदाय सक्षम बनत आहेत.
भिवपुरी जलविद्युतसारखे प्रकल्प शुद्ध व हरित उर्जेला प्रोत्साहन देऊन २०४५ सालाआधी कार्बन तटस्थता साध्य करण्याच्या टाटा पॉवर कंपनीच्या वाटचालीत मोलाचे योगदान देत आहेत.