मुक्तपीठ टीम
टाटा पॉवर आणि अपोलो टायर्सने भारतभरात ईलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग स्थानके उभारणीसाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही चार्जिंग स्थानके देशभरात पसरलेल्या अपोलो टायर्सच्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहन विभागांत असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग परिसंस्थेच्या सर्व विभागांत टाटा पॉवर कार्यरत आहे आणि डीसी ००१, एसी, टाईप २, ५० किलोवॅट पर्यंतचे फास्ट डीसी चार्जर्स आणि त्या ठिकाणी असलेल्या बसेससाठी २४० किलोवॅट पर्यंतचे चार्जर्स त्यांच्याकडे आहेत. या विविध चार्जर्सच्या वर्गीकरणामुळे अनुक्रमे दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगला गती मिळेल.
अपोलो टायर्स आणि टाटा पॉवर मध्ये असलेल्या करारानुसार, टाटा पॉवर सुरुवातीला अपोलो टायर्सच्या सीव्ही आणि पीव्ही झोन्सच्या १५० ब्रँडेड रिटेल आऊटलेट मध्ये चार्जिंग स्थानके उभारेल. या टायरच्या दालनांत येणाऱ्या ग्राहकांच्या जोडीलाच वर्षभर सर्वसामान्य जनतेसाठीही ही चार्जिंग स्थानके वापरासाठी खुली राहतील.
टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.प्रवीर सिन्हा म्हणाले, “भारतभरातील आपल्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहन विभागांत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी अपोलो टायर्स बरोबर भागीदारी करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची परिसंस्था विकसीत करण्यासाठी आणि विस्तारासाठी आमची असलेली बांधिलकी या भागीदारीतून प्रतीत होते.”
या भागीदारीविषयी बोलताना अपोलो टायर्सच्या आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका विभागाचे अध्यक्ष सतीश शर्मा म्हणाले, “भारतातील टायर आणि वाहन क्षेत्रांत आम्ही उचललेल्या अनेक पहिल्या चालींपैकी ही एक आहे. आमच्या व्यावसायिक भागीदाराच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीची पायाभूत सुविधा उभारणे ही गोष्ट देशात हरित दळणवळणाला चालना देण्याच्या आमच्या ध्येयाला बळकटी आणणारी आहे. टाटा पॉवरच्या प्रचंड मोठ्या सर्व्हिस नेटवर्कमुळे सर्व ठिकाणी विना अडथळा चार्जिंग सुविधा मिळू शकेल याबद्दल आम्हांला खात्री आहे.”
ग्राहकांना चांगला आणि सुलभ अनुभव देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मसह ईझेड चार्ज ब्रँडच्या अंतर्गत वेगवेगळ्या २०० शहरांमध्ये १००० हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग पॉईंटसह टाटा पॉवरने इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंगसाठीची विस्तृत पायाभूत सेवा यंत्रणा उभारली आहे. सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानकांचे जाळे विविध कार्यालयातील, मॉल्स, हॉटेल्स, रिटेल दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणच्या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण आणि सीमलेस ईव्ही चार्जिंग अनुभव पुरवत आहे. त्यातून स्वच्छ, हरित दळणवळणाला चालना आणि रेंज अस्वस्थतेपासून सुटका मिळते. टाटा पॉवर ईझेड चार्जर्सची परिसंस्था सार्वजनिक चार्जर्स, कॅप्टीव्ह चार्जर्स, बस/ वाहन ताफा चार्जर्स आणि होम चार्जर्स अशा सगळ्यांची संपूर्ण मूल्य साखळी सामावून घेते. आपल्या ग्राहकांना साधा, सरळ आणि सोपा चार्जिंग अनुभव देण्यासाठी टाटा पॉवरने इलेक्ट्रिक वाहनांच्या ग्राहकांसाठी चार्जिंग करता मजबूत सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मही विकसीत केला आहे आणि मोबाईल वर आधारित अॅप्लिकेशन (टाटा पॉवर ईझेड चार्ज) सादर केले आहे. अॅपमुळे ईव्ही चार्जिंग स्थानक शोधणे, इलेक्ट्रिक वाहन चार्ज करणे आणि ऑनलाईन बिल भरणे या सगळ्याला मदत होणार आहे.
भारतात इलेक्ट्रिक दळणवळणाचा वेगाने अंगीकार होण्यासाठी ईव्ही चार्जिंग साठीची पायाभूत सुविधा यंत्रणा विकसीत होणे आणि उपलब्ध होणे ही मुख्य गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनचालकांना विविध ठिकाणी आपली वाहने चार्ज करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर आणि अपोलो टायर्सची भागीदारी महत्वाची भूमिका पार पाडेल.