मुक्तपीठ टीम
सामान्यातील सामान्यालाही चार चाकीमधून प्रवास करता यावा या उद्देशाने टाटांनी लाँच केलेली नॅनो कारचा आता इलेक्ट्रिक अवतारात आलीय. नॅनोचं स्वप्न ज्यांनी पाहिले आणि साकारले त्या उद्योगपती रतन टाटांनीही नॅनो ई-कारची डिलिव्हरी घेतली. ही ई-कार सध्या कस्टम मेड असणार आहे.
उद्योगपती रतन टाटा म्हणजे भारताच्या उद्योग विश्वातील ते व्यक्तिमत्व जे काळाच्या पुढचा विचार करते, पण केवळ स्वत:च्या उद्योगहितासाठी नाही, तर अवघ्या देशासाठी, देशातील लोकांसाठीही! टाटा नॅनो या परवडणाऱ्या कारची संकल्पनाही अशीच त्यांच्या डोक्यात स्फुरली. त्यातूनच त्यांनी आर्थिक विचार न करता आपल्या टीमला कामाला लावले. एक लाख रुपयातील कार प्रत्यक्षात आणली. काही कारणांमुळे म्हणावी तशी ती लोकांच्या पसंतीस उतरली नसली तरी आपणही कार वापरू शकतो हा विश्वास मात्र टाटांनी सामान्यांच्या मनात रुजवला. आता टाटा नॅनोला इलेक्ट्रिक अवतारात सादर केलं गेलं आहे. त्या खास बनवण्यात आलेल्या कस्टम मेड नॅनो ई-कारची स्वत: रतन टाटांनी डिलिव्हरी घेतली.
इलेक्ट्रोड्राइव्ह पॉवरट्रेन सोल्युशन्सने घडवला नॅनोचा ई-अवतार!
नॅनोचे संकल्पक रतन टाटा यांनी अलीकडेच कस्टम-मेड टाटा नॅनो इलेक्ट्रिक वाहनाची डिलिव्हरी घेतली. जी इलेक्ट्रोड्राइव्ह पॉवरट्रेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे सुधारित केली गेली आहे. कंपनीने आपल्या लिंक्डइन पेजवर टाटाच्या टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारसोबत पोझ केलेला एक फोटो पोस्ट केला आहे. रतन टाटा यांना ७२व्ही नॅनो ईव्ही वितरित करणे आणि त्यांचा अभिप्राय मिळणे ही अतिशय अभिमानाची भावना असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
टीम ईलेक्ट्रा ईव्हीसाठी हा मूव्हमेंट ऑफ ट्रूथ!
कंपनीने हा फोटो शेअर करत लिहिले की, “टीम ईलेक्ट्रा ईव्हीसाठी हा मूव्हमेंट ऑफ ट्रूथ आहे, जेव्हा आमच्या संस्थापकाने ईव्हीच्या पॉवरट्रेनवर आधारित कस्टम-बिल्ट नॅनो ईव्हीतून प्रवास केला. आम्हाला रतन टाटा यांची नॅनो ईव्ही वितरीत करून आणि त्यांच्याकडून अभिप्राय मिळाल्याचा अभिमान वाटतो.
इलेक्ट्रा ईव्ही नॅनोचे भन्नाट फिचर्स
- इलेक्ट्रा ईव्ही कंपनीने नॅनोला कस्टमाइझ करून इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित केले आहे.
- नॅनो ईव्हीची रेंज १६० किलोमीटरपर्यंत आहे.
- कार १० सेकंदांपेक्षा कमी वेळेत शून्य ते ६० किमी प्रतितास वेग वाढवते.
- नॅनो ईव्हीमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.
- या कारबद्दल टाटा मोटर्सचे म्हणणे आहे की, यामुळे कारचा खरा अनुभव येतो.
- आधुनिक ग्राहकांना इको-फ्रेंडली वैयक्तिक वाहतूक प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात कोणतीही तडजोड केलेली नाही.