मुक्तपीठ टीम
जर प्रतिभेला प्रामाणिक परिश्रमाची जोड असेल तर स्वप्न कितीही उंच भरारी घेण्याचं असलं तरी ते साकारणे अशक्य नसते. हे उगाच नाही बोलत मी. तुम्हाला कोकणातील स्वप्नाली सुतार आठवते का? तीच जिच्या घरी मोबाइल डेटा नेटवर्क मिळत नसल्याने डोंगरावरील छपराखाली बसून तिला अभ्यास करावा लागत होता.
स्वप्नाली सुतार मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकते. कोरोना संकटामुळे ती कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावातूनच ऑनलाइन शिक्षण घेत होती. परंतु गावातील घरात नेटवर्क नसल्याने तिला ऑनलाइन वर्गात शिकण्यासाठी डोंगरावर जावे लागत होते. डोंगरावरील झोपडीत इंटरनेट मिळत असल्याने तिने तेथूनच अभ्यास सुरु केला. तीची व्यथा-कथा माध्यमं, समाजमाध्यमांमधून सर्वत्र पोहचली आणि तिला घरीच नेटवर्क मिळालं. स्वप्नालीनं त्याचं सोनं केलं. नुकत्याच झालेल्या पशुवैद्यकीय विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत स्वप्नालीने वर्गात प्रथम क्रमांक पटकावला आहे
गेल्या वर्षी स्वप्नाली सुतार तिच्या गावाजवळच्या डोंगरमाथ्यावर भर पावसात अभ्यास करतानाची माहिती सगळीकडे व्हायरल झाली. पावसापासून बचावासाठी ती प्लॅस्टिकच्या झोपडीत अभ्यास करत असे. काही काळातच तिचे अभ्यासासाठीचे कष्ट देशभर पसरले. त्याचबरोबर डेटाक्रांतीच्या काळातील तिला नेटवर्कसाठी करावे लागत असलेल्या कष्टाची व्यथाही. त्यामुळे स्थानिक खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे यांनी तिच्या मदतीसाठी प्रयत्न केले. केंद्र सरकारने गणेशोत्सवाच्या कालावधीत दारिस्ते गावातील स्वप्नालीच्या घरी बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध करून दिले होते. स्वप्नालीचा त्रास दूर करण्यासाठी आम्ही कणकवलीकर परिवार, इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनीही सहकार्य केले होते. विशेष म्हणजे काहीजणांचे सहकार्य तिने विनम्रतापूर्वक नाकारलेही होते. आता तिने प्रतिकुलतेनंतर मिळालल्या सुविधेच्या संधीचं सोनं केल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. तिने आपल्या परिश्रमाच्या जोरावर पशुवैद्यकीय शास्त्रात वर्गात पहिले येणं हे चांगले यश मानले जात आहे. त्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वप्नालीच्या परिश्रमाचा सुगंध दरवळवणाऱ्या यशाला मुक्तपीठ टीमचा मानाचा मुजरा!
पाहा व्हिडीओ: