डॉ. राजेश सर्वज्ञ
स्वामी विवेकानंद…त्यांचं ते ऐतिहासिक भाषण…केवळ भारतालाच नाही तर अवघ्या जगाच्या विचारांना नवी दिशा मिळवून देणारे असे ते भाषण. स्वामीजींनी ११ सप्टेंबर १८९३च्या अमेरिकेतील शिकागोमधील जागतिक सर्वधर्म परिषदेत ते भाषण केलं होतं. जागतिक मंचावर भारताची एक नवी ओळख…उदारमतवादी अध्यात्मिक ओळख या भाषणामुळे निर्माण झाली. स्वामी विवेकानंदांच्या त्या भाषणाला आज १२७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं आजही, अगदी आजच्याही पिढीला दिशादिग्दर्शन करणारे ते भाषण मुक्तपीठच्या वाचकांसाठी जसं आहे तसं मांडत आहोत:
अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो,
आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय आनंदानं भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, कोटी कोटी हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो.
जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.
बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात.
“रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम् ।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव”।।मराठी अनुवाद:
“ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.”
आजची ही पवित्र परिषद आजवरच्या सर्वश्रेष्ठ पवित्र परिषदांपैकी एक आहे. तसेच भगवद्गगीतेमधील या अदभुत अशा उपदेशाला वैश्विक बांधिलकीतून मांडत आहे.
“ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः”।।मराठी अनुवाद:
“जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो”.
सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केलीय. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.
(डॉ. राजेश सर्वज्ञ हे विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक आहेत. स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी युवा वर्गाला जोडण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.)