मुक्तपीठ टीम
कुस्तीपटू सुशील कुमारला अटक झाल्यानंतर आता त्याची पदकं परत घेतली जाणार का, यासंदर्भातल्या चर्चा सुरु झाल्यात. हत्या प्रकरणात अटक झालेल्या, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता राहिलेला सुशील कुमारवर पदकं गमावण्याची वेळ येऊ शकते.
सुशील कुमारला पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र आता हत्याप्रकरण, फरार झाल्यानंतर १ लाखांचं बक्षीस आणि पोलिसांनी अटक केल्यानंतर सुशील कुमारच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहे. नियमाप्रमाणे खेळाडूच्या शरिरात स्टिरॉईड सापडल्यास त्याला दिली गेलेली सन्मानचिन्ह परत घेतली जातात. अमेरिकेत असा प्रकार घडला आहे. सुशील कुमारचे प्रकरण वेगळे आहे. पण न्यायालयात सुशीलकुमार दोषी आढळल्यास केंद्र आणि राज्य सुशील कुमारला दिलेली सन्मानचिन्ह परत घेऊ शकतात, असं कायद्याचे जाणकार सांगतात.
सुशील कुमारला ६ दिवसांची पोलीस कोठडी
२३ वर्षीय कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी न्यायालयाने सुशील कुमार आणि त्याचा सहकारी अजय बक्करवाला ६ दिवसांसाठी दिल्ली पोलिसांकडे ताबा दिला आहे. रविवारी संध्याकाळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
सुशील कुमारच्या अटकेनंतर सोशल मीडियावर चर्चा
सुशील कुमारला अटक झाल्यानंतर ट्विटरवर #sushilkumararrest हा ट्रेंड होता. ज्यामध्ये १ हजार १६३ ट्विट्स केले गेले होते. सुशील कुमारला आपला आदर्श मानणाऱ्यांनी आपण दुःखी झाल्याचं सांगितलं आहे.