उदयराज वडामकर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मेघराज राजे भोसले यांची उचलतागडी करत नूतन अध्यक्ष म्हणून अभिनेता सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची कार्यकारी मंडळाची बैठक आज बुधवार दिनांक २२ जून २०२२ रोजी हॉटेल केट्री कॉन्फर्नस, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे संपन्न झाली.
कार्यकारिणीची मीटिंग न झाल्यामुळे कोणतेही निर्णय होत नव्हते. महामंडळाच्या अनेक संचालकानी प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांच्या निदर्शनास ही बाब आणली व वारंवर विनंती केली. त्यानंतर कार्यकारिणीची बैठकीचं आयोजन केले. कोल्हापूर येथील हॉटेल के ट्री येथे संचालक यांची बैठक झाली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित न राहिल्यामळे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मागील कार्यकारिणी बैठकीत मेघराज राजेभोसले यांच्यावर बहुमताने अविश्वासाचा ठराव पास करण्यात आला होता.
आजच्या बैठकीमध्ये सदर ठरावावर हरकत घेण्यात येऊन तो ठराव आजच्या बैठकीत कायम करण्यात आला. त्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसलेंवर अविश्वास ठराव परत बहुमताने मंजूर झाल्यामुळे त्यांचा जागी अभिनेता सुशांत शेलार यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
आजच्या बैठकीस एकूण १५ संचालकापैकी १० संचालक उपस्थित होते. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आजच्या बैठकीत बहुमताने जे निर्णय होतील त्यास पाठींबा राहील असे पत्राद्वारे कळविले. विजय खोचीकर, संजय ठूबे, चैत्राली डोंगरे यांनी लेखी स्वरुपात अनुपस्थिती कळवली होती त्यांची नोंद घेण्यात आली. त्यामध्ये नवीन अध्यक्ष पदी शेलार तर कार्यवाहपदी रणजित जाधव यांची निवड करण्यात आली.
माजी अध्यक्षयांनी आजच्या सभेवर आक्षेप घेतला होता तो आक्षेप संचालकांनी बहुमताने फेटाळून लावला. संचालक बैठक नोटीस काढण्याचा व बैठक घेण्याचा अधिकार घटनेप्रमाणे प्रमुख कार्यवाह यांना असल्याने हा आरोप फेटाळण्यात आला. अध्यक्ष यांनी संचालकाना विश्वासात न घेता काही निर्णय परस्पर व मनमानी पदधतीने घेतले होते.
आजी-माजी १४ संचालकांना नोटीस बजावली असून सभासदत्व रद्द केले होते. या विषयावर साधक-बाधक चर्चा करून त्यांच्यावरचे आरोप फेटाळन्यात आले. चौदा संचालकांना पूर्वीप्रमाणे सभासद बहाल करण्यात आले, असा ठराव मंजूर करण्यात आला. आजच्या बैठकीत महामंडळाच्या भावी कार्याबद्दल तसेच होणाऱ्या संबंधित निवडणूक यावर चर्चा करून पुढील बैठकीत यावर निर्णय घेण्याचे ठरले तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के वाढ करण्यात आली.
कार्यकारी मंडळाची आजची सभा खेळीमेळीने पार पडली. मा कार्यवाह यांनी सर्वाचे स्वागत व आभार मानले. यावेळी सुशांत शेलार, धनाजी यमकर, रणजीत जाधव, सतिश बिडकर,शरद चव्हाण, रविन्द्र गावडे, पितांबर काळे, सतिश रणदिवे, निकीता मोघे,रत्नकात जगताप इत्यादी पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.