मुक्तपीठ टीम
आंबिल ओढ्यातील घरांवर पुणे मनपाने केलेल्या कारवाईला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या पुढकारामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. मात्र, ऐन पावसाळ्यातील त्या अतिक्रमण कारवाईमुळे आता राजकारण तापू लागले आहे. गरीबांची घरे तोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. पुण्याच्या महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे सुप्रिया सुळे ठणकावले आहे.
पुण्यात बोलताना त्या म्हणाल्या की, “पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असे खडे बोल सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहेत.