मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसू न शकलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने या उमेदवारांना दिलासा देत मुख्य परीक्षेला बसण्यासाठी एक संधी आणखी देण्याबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. त्याबाबत दोन आठवड्यांत पुनर्विचार करा, असे न्यायालयाने ले सांगितले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
- न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना कोरोनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत बसू शकले नव्हते, अशा विद्यार्थ्यांचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले.
- मार्च २०२२च्या संसदीय समितीच्या अहवालात या प्रकरणावर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- यूपीएससी इच्छुकांनी त्यांच्या याचिकेत अतिरिक्त प्रयत्नांची मागणी केली होती.
- सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
याचिकाकर्त्याची मागणी
- वकील शशांक सिंह यांनी यासंदर्भात तीन यूपीएससी उमेदवारांच्या वतीने याचिका दाखल केली होती.
- कोरोनामुळे ज्या उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा शेवटचा प्रयत्न चुकला, ते दुसऱ्या संधीचे हक्कदार आहेत. यूपीएससीकडे अशा संभाव्य परिस्थितीसाठी कोणतेही धोरण नाही, असा युक्तिवाद सिंह यांनी केला.
- मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत झाली.
- कोरोनाची लागण झाल्यामुळे आणि कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे ते मुख्य परीक्षेला बसू शकले नाहीत, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.