मुक्तपीठ टीम
पेगॅसस हेरगिरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचं पाऊल उचललं आहे. न्यायालयाने त्याचा तपास तज्ज्ञ समितीकडे सोपवला आहे. याबद्दलची माहिती न्यायालयाने यापूर्वीच दिली होती. सुप्रीम कोर्टाने १३ सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने या प्रकरणी भाष्य करताना लोकांसोबत होणाऱ्या हेरगिरीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे नेतृत्व निवृत्त आरव्ही रविद्रन करणार आहेत. या प्रकरणी केंद्राने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
केंद्र सरकार पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून नागरिकांची हेरगिरी करत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमण्णा या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत त्याचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी करण्यात आली होती. १३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने या संदर्भात काही दिवसांत निकाल देणार असल्याचेही सांगितले होते.
पेगॅसस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाचे मुद्दे
- २३ सप्टेंबर रोजी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देण्यास थोडा विलंब झाल्याचे म्हटले होते.
- न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या काही याचिकांमध्ये या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, असे म्हटले आहे.
- काही राजकारणी, कार्यकर्ते आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यासाठी याचा वापर केला जात होता. असे पेगॅसस प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.
- केंद्राच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, ते या प्रकरणी एक समिती स्थापन करत आहे जी पेगॅसस प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींवर लक्ष ठेवेल.
“फोन टॅप करण्याचा अनेक मान्यवरांचा केंद्रावर आरोप
- पत्रकार एन राम, शशी कुमार, कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास, वकील एमएल शर्मा, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, आरएसएसचे विचारवंत केएन गोविंदाचार्य यांनीही आपली याचिका न्यायालयासमोर मांडली आहे.
- काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांचा फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप केंद्रावर केला आहे.
- केंद्राने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, विरोधक या प्रकरणाला सातत्याने महत्त्व देत आहेत.
- असे म्हटले जाते की, या सॉफ्टवेअरचा वापर करून ३०० हून अधिक लोकांचे फोन देखील टॅप केले गेले आहेत.