सुनिल सांगळे
कोरोना व्हायरसच्या संदर्भात एक इंग्रजी व्हिडीओ हल्लीच पाहण्यात आला होता. त्याचा सारांश असा होता की मानवाने हे समजू नये की सृष्टीमातेचा तो सर्वात लाडका पुत्र आहे आणि त्याला इतर सर्व जीवसृष्टीचा नाश करण्याचा परवाना मिळाला आहे. लाखो जीवांप्रमाणेच मानव एक प्रजाती आहे आणि संपूर्ण पर्यावरणाचा समतोलच जर मानव ढासळवून टाकत असेल, तर मानव जातीलाच नाहीसे करण्याचा निसर्गाला विचार करावा लागेल असा निष्कर्ष त्यात काढला होता. यावरून मानवाने किती प्राणी आणि इतर प्रजातींचा विनाश केला आहे ते आठवले. त्याची थोडक्यात कथा!
साधारण २५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात मानव जातीचा उगम झाला आणि २० लाख वर्षांपूर्वी तिथून युरेशिया भागात ते पसरले व मानवाच्या काही प्रजातींची उत्क्रांती झाली. ५ लाख वर्षांपूर्वी युरोप आणि मध्यपूर्वेत निअँडर्थल मानव उत्क्रांत झाला. सध्याच्या मानवाचा पूर्वज असलेला होमो सेपियन २ लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत उत्क्रांत झाला. यानेच ३०,००० वर्षांपूर्वी निअँडर्थल मानवाच्या प्रजातीचा विनाश केला आणि फक्त होमो सेपियन प्रजातीचे राज्य पृथ्वीवर स्थापन केले. हे करण्यापूर्वीच ४५,००० वर्षांपूर्वी होमो सेपियन ऑस्ट्रेलिया खंडात पोहोचले होते आणि तिथून हजारो प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, वनस्पती यांच्या विनाशाची सुरवात झाली होती. त्यापूर्वी मानव स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेत होता. पण या वेळेपासून त्याने वातावरणाला आपल्याशी जुळवून घेणे भाग पाडायला सुरवात केली.
ऑस्ट्रेलिया खंड हे इतर जगापासून वेगळे पडलेले असल्याने तेथील प्राणी, पक्षी आणि वनस्पती सृष्टी वेगळ्याच प्रकारे उत्क्रांत झालेली होती. होमो सेपियन्स तिथे पोहोचल्यावर त्यांनी अनेक चित्रविचित्र प्राणी पाहीले. २०० किलो वजनाचे कांगारू, Marsupial (म्हणजे कांगारूसारखे पोटातील पिशवीत पिल्ले ठेवणारे प्राणी) प्रजातीचे सिंह, प्रचंड कोआला, शहामृगाच्या दुप्पट वजन असणारे न उडणारे पक्षी, ड्रॅगन सारखे सरपटणारे प्राणी, भलेमोठे सर्प, अडीच टन वजन असणारे Diprotodon हे अस्वलासारखे दिसणारे प्राणी या मानवांनी प्रथमच पाहीले. यातील पक्षी व सरपटणारे प्राणी सोडून इतर सर्व Marsupial होते. ऑस्ट्रेलियातील १० ते २० लाख वर्षात उत्क्रांत झालेल्या २४ मुख्य प्रजातींपैकी, २३ प्रजाती मानवाने केवळ काही हजार वर्षात नष्ट केल्या. हेच न्यूझीलंड मध्ये झाले. तिथे माओरी जमातीचे लोक ८०० वर्षांपूर्वी पोहोचले आणि लगेच तेथील बऱ्याचश्या स्थानिक प्राण्यांच्या जाती आणि ६० टक्के पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या.
Mammoth या प्राचीन हत्तीच्या प्रजातीबाबतही हेच झाले. प्रचंड सुळे आणि अंगावर मोठे केस असणारे हे Mammoth उत्तर गोलार्धात अनेक दशलक्ष वर्षे अस्तित्वात होते. होमो सेपियन तिथे पोहोचले, आणि १०,००० वर्षांपूर्वी Mammoth नष्ट झाले. अत्यंत दुर्गम अशा आर्क्टिक भागातील बेटांवर ते शेवटी अस्तित्वात होते, आणि तिथे मानव पोहोचताच ४००० वर्षांपूर्वी तेही नष्ट झाले.
हेच अमेरिका खंडाबाबत झाले. त्या खंडातही आफ्रिका आणि आशिया या खंडात न आढळणारी अत्यंत समृद्ध प्राणीसृष्टी लाखो वर्षात उत्क्रांत झाली होती. इथेही Mammoth, अस्वलांच्या आकाराचे उंदरासारखे प्राणी, जंगली घोडे आणि उंट, मोठ्या आकाराचे सिंह, प्रचंड आकाराचे सुळे असलेले मार्जार प्रजातीतील प्राणी, आणि आठ टन वजनाचे व सहा मीटर उंची असलेले स्लॉथ अस्तित्वात होते. दक्षिण अमेरिकेतही अत्यंत वैविध्यपूर्ण प्राणी आणि वनस्पती अस्तित्वात होत्या. मानव तिथे पोहोचल्यावर केवळ दोन हजार वर्षात यापैकी बऱ्याचशा प्रजाती नष्ट झाल्या. उत्तर अमेरिकेतील ४७ पैकी ३४, आणि दक्षिण अमेरिकेतील ६० पैकी ५० प्राण्यांच्या प्रजाती, ज्या ३० लाख वर्षात उत्क्रांत झाल्या होत्या, त्या नष्ट झाल्या आणि त्यांच्याबरोबरच प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या, कीटकांच्या हजारो प्रजाती नष्ट झाल्या. लाखो वर्षे अलग पडल्यामुळे मादागास्कर या बेटावर वेगळीच प्राणीसृष्टी उत्क्रांत झाली होती, यात तीन मीटर उंच आणि अर्धा टन वजनाचा जगातील सर्वात मोठा न उडणारा पक्षी (Elephant Bird) आणि जगातील सर्वात मोठ्या आकाराचे लेमुर माकड, यांचा समावेश होता. मानव त्या बेटावर पोहोचला आणि १५०० वर्षांपूर्वी हे सगळे प्राणी नष्ट झाले.
याच कथेची पुनरावृत्ती अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, भूमध्य सागर, हिंदी महासागर येथे पसरलेल्या शेकडो बेटात झाली. त्या बेटातही अलगीकरणाच्या प्रक्रियेने अत्यंत वेगळी जीवसृष्टी उत्क्रांत झाली होती आणि मानव पोहोचल्यावर तिचा पूर्ण विनाश झाला. आजही गेलापागो बेटावर जगावेगळे प्राणी आढळतात, उदा.प्रचंड कासव, समुद्रात पोहोणारा इग्वाना, उडता न येणारे कॉर्मोरंट पक्षी, डायनोसार युगापासून अस्तित्वात असलेले ग्रीन टर्टल, इत्यादी. इथे मानव उशिरा पोहोचल्याने ते शिल्लक राहिले आहेत. मानवाच्या या सर्व संहारातून अजूनही थोडे वाचले आहेत ते समुद्रातील प्राणी, कारण मानव तिथे वस्ती करू शकला नव्हता. परंतु मागील शंभर एक वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाने होत असलेला समुद्रातील प्राण्यांच्या बेसुमार संहार पाहता शार्क, ट्यूना, डॉल्फिन आणि व्हेल या समुद्री जीवांचा पूर्ण विनाश होऊ शकतो.
आणि ही झाली केवळ जीवसृष्टीच्या विनाशाची कथा! बाकी पर्यावरणाची काय अवस्था झाली आहे, कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमानात वाढ, नद्यांचा नाश, बिघडलेले ऋतुचक्र, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि अनावृष्टी, इत्यादी गोष्टी आज सर्वांनाच माहित आहेत. ईश्वर, मदर नेचर, किंवा सृष्टीमाता या नावाने कोणी अस्तित्वात असो किंवा नसो, निसर्गनियम म्हणून जो एक प्रकार आहे, त्यानुसार जर मनुष्यप्राणी हा संपूर्ण पृथ्वीच्या जीवसृष्टीचा आणि पर्यावरणाचाच समतोल बिघडवीत असेल, तर त्याचे परिणाम आपल्या जमातीला भोगावे तर लागतीलच! आपणच सृष्टीचे लाडके पुत्र आहोत हा समज आपला असू नये. डायनासॉरसारखे प्राणी लाखो वर्षे उत्क्रांत झाले, आणि त्यांनी लाखो वर्षे पृथ्वीवर राज्य केले, ते नष्ट झाले हे कोणाला आठवते तरी का? मग १० हजार वर्षात मानवाने प्रचंड प्रगती केली आणि त्यानंतर स्वतःचा विनाश ओढवून घेतला हे कोण लक्षात ठेवील?
लेखक सुनिल सांगळे हे सेवानिवृत्त सहआयुक्त (विक्रीकर विभाग) आहेत.
ग्रंथालीनं प्रकाशित केलेले त्यांचे “जातीव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जातीजमाती” हे पुस्तक चर्चेत आहे.