सुमेधा उपाध्ये
कोरोनाच्या काळात सद्या एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्या सुरक्षिततेसाठी आपण थेट देवाजवळ प्रार्थना करतोय. प्रार्थना ही महत्वाची असतेच, कारण प्रार्थनेत नम्रता आहे आणि समर्पणही आहे. याच वेळी हे ही लक्षात आलं की मीच नव्हे तर माझ्या घरातल्या सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम असणे महत्वाचे आहे. मग आपल्या प्रार्थनेत त्यांचाही समावेश झाला. पुन्हा लक्षात आलं की अरे आपलं कुटुंब निरोगी असणं जेवढं महत्वाचं आहे तितकेच आपल्या आजूबाजूला राहणारेही निरोगी रहावेत. त्यांनाही या कोरोनापासून दूरच ठेव देवा ही प्रार्थना सुरू झाली… नंतर समूह समाज गाव शहर देश आणि पर्यायाने जगभारातील सर्वांनाच कोरोना मुक्त कर देवा अशी प्रार्थना आपण करीत आहोत. म्हणजेच आपला दृष्टीकोन रूंदावला आणि आपण जगभारातल्या सर्व मानवांना लवकरच या कोरोनापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करतोय. कारण विज्ञान युगात जग जवळ आलंय. या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जे घडेल त्याचे परिणाम थेट आपल्यापर्यंत पोहचणार आहेत. मग प्रश्न असा की ही प्रार्थना खरोखरच सहाय्यभूत होते का? तर निश्चित होते. कारण आपल्या विचारांच्या संवेदना दूर दूर पर्यंत पसरतात. आपण जो विचार करतो, जे बोलतो त्याचा परिणाम स्वरूप त्या त्या वातावरणात दिसू लागतो. त्यासाठी एक उदाहरण पाहता येईल की एका प्रयोग शाळेत एका एका पाण्याच्या भांड्यांमध्ये काही एक पेशीय जीव वेगवेगळे ठेवलेले होते आणि एके दिवशी लक्षात आले की त्यांच्यात काही तरी खूप मोठी हालचाल होतेय. नकारात्मक परीणाम होतोय. त्या जीवांना त्रास होतोय, तर असं लक्षात आलं की सर्व सजीव सृष्टीचा त्राता हा सूर्य देव आहे त्याच्या काही विघातक किरणांचा हा परिणाम होता. सुर्यापासून शंभर एक वर्षात कधीतरी किंवा त्या आधी असे विघातक उत्सर्जन होत असते. तसंच असंही म्हणतात की सूर्याची किरणं पृथ्वीवर येण्यास साधारणत: सात आठ मिनिटं वेळ लागतो. मग या सूर्याच्या विघातक किरणांचा परिणाम झाल्याची लक्षण या एकपेशी जीवांवर त्याच रियल टाईममध्ये कशी झाली. तर बऱ्याच संशोधनानंतर लक्षात आलं की सुर्याची किरणं जो प्रवास करून येतात त्या पोकळीत पाण्याचा अंश आहेच आणि त्याचा संपर्क फारच लवकर दुसऱ्या पाण्याशी होतो. म्हणजेच पाण्याच्या संपर्कात जे येते ते त्वरीत परिणाम करणारे किंवा परिणाम दर्शवणारे असते. यासर्व प्रयोगातून सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. पृथ्वीचा भारही पाण्याच्या लहरींवर आहे. आपल्या शरीरातही पाण्याचे प्रमाण जास्त आहे. आपलं शरीर शुद्ध ठेवण्यासाठी जे हृदय कार्यरत आहे ते रक्त . त्पातही पाण्याचा समावेश आहे. त्यामुळे या पंचमहाभूतातील पाणी हे तत्व सर्वव्यापी आहे आणि त्याच्या मार्फत संवेदना सर्वदूर त्याच क्षणी पोहचत असतात त्यामुळे एकाचा परिणाम सर्वांवर सर्वदूर होत असतो. हेच अन्य प्राण्याच्या संदर्भातही घडत असतं.
याच तत्वानुसार अखिल मानवाचे विचार त्याची स्पंदन जगभारातल्या मानवांवर कुठे ना कुठे परिणाम घडवित असतात. तसंच एका ठिकाणची प्रार्थना याच नुसार जगभरातल्या अनेक जीवांना सहाय्य करणारी ठरते. संवेदना स्पंदनं ही अशीच त्वरीत या पाण्याच्या अंशांमधूनच प्रवाहीत होतात. एका मानवाची एका समूहाची प्रार्थनाही अशीच दूरवर परिणाम करते. हिच वैश्विक प्रार्थना आपल्या संतांनी पूर्वीपासूनच म्हटलीय. मग –
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
ऊँ शांतिः शांतिः शांतिः
अर्थ – ” सर्वांना सुखी होवोत, रोगमुक्त राहोत, सर्वांचे मंगल होवो, सर्व त्याचे साक्षी होवोत आणि कोणासही दुःखात ठेवू नकोस।”
हा शान्तिपाठ उपनिषदात आहे. आपणही पूर्वी संध्याकाळी परवचा म्हणायचो तेव्हा ही प्रार्थना म्हणत होतोच. तसंच पसायदान आहे. ज्ञानेश्वरीच्या लेखनाचे कार्य संपूर्ण झाल्यानंतर ज्ञानदेवांनी पसायदान रचले त्यातही त्यांनी सर्वांसाठी मागणं मागितलं आहे. सर्वांचे म्हणजेच समस्त जीवांच्या हितामध्येच आपले हित दडलेले आहे हा संस्कार त्यांनी तेव्हाच रूजवला होता. मात्र मध्यंतरीच्या भौतिकतेच्या आसक्तिने माणसांना स्वार्थी बनवले. आपल्या भावभावना केंद्रीत झाल्या विज्ञानाने वाढवलेला अहंकार माणसाला माणसांबद्दलच्या संवेदनांपासून दूर घेऊन गेला,. शेजारच्या घरातल्या सुख दु:खांपासून आपण अलिप्त रहात होतो. अहंम् आणि स्व केंद्रीत मनुष्याने प्रगतीची दालनं पार केली पण व्यापक सामाजीक हितापासून तो दूर गेला.
वैश्विक प्रार्थना आणि आपल्यासह दुसऱ्यांच्या सुखदुखाची जाण ठेवण्यातील महत्व आता या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अशाच समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी पुन्हा घराघरातून अशा वैश्विक प्रार्थनांचे सूर उमटले तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम नजिकच्या भविष्यात झालेला आपण पाहू शकतो.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)