सुमेधा उपाध्ये
आपल्या हिंदू संस्कृतिमधील ऋषी आणि पुराणांची रचनाकरणारे विद्वान सर्वच तीव्र बुद्धिमत्तेचे होते. सत्य न्याय प्रेम संयम नैतिकता यांचे संदेश देऊन अखिल मानव जातिचे कल्याण साधण्यासाठी त्यांनी धार्मिक आणि नैतिकतेच्या कथांचं विश्व निर्माण केलं. भारतातील हे साहित्य विश्व समृद्ध आहे. त्यांनी संवादाचा प्रभावी उपयोग केलेला आहे. अनेक कथांची सुरूवात शिव पार्वतिच्या संवादाने होते. प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कथांचा जन्म झालेला आहे. त्यामधून कधी थेट तर कधी गुप्त स्वरूपात संदेश देण्याचं कार्य केलं आहे.
अशा धार्मिक पौराणिक कथांच्या आडून एक मोठा वैज्ञानिक दृष्टीकोन स्पष्ट होतो. माणसाचं मन जागेपणी जितका विचार करतं तितकाच किंवा त्याहून अधिक सूक्ष्म विचार त्याच्या झोपेत सुरू असतो. अशा कथांचा सुप्त मनावर खोलवर परिणाम होत असतो. त्यामुळे जे संस्कार होत राहतात ते मानवाच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करीत असते. नाटक किर्तन गायन यातील कथांचा परिणाम अधिक होत असतो. या माध्यमातून नैतिक नियम, परम्परा, उपदेश मंत्र असे सर्व विविध स्वरूपात कथारूपाने वारंवार सांगितले गेलेय त्यामुळे आपले सुप्त मन हे सर्व आत्मविश्वासाने ते ग्रहण करीत असेते. हे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मानसोपचार तज्ज्ञांनीही मान्य केलं आहे. आपले सुप्त मन आपल्या बाह्य मनावर खूप प्रभाव टाकतं त्यामुळे या सुप्त मनावर झालेल्या संस्कारांमुळे मानवातील दुष्ट प्रवृत्ती स्वार्थ क्रुरता शुद्र इच्छा वासना या सर्वांवर नियंत्रण ठेवणे या सुप्त मनाला सहज शक्य होते.
लहानपणापासून अशा धार्मिक पौराणिक आणि नंतरच्या काळात ऐतिहासिक कथांच्या माध्यमातून संस्कारांचे आदानप्रदान होत असे. दुष्ट प्रवृत्तींचा त्याग त्यातून होत असे. आपण जे जे कार्य करीत आहोत त्यातून आपल्यासह समाजाचे भले होत आहे का? याचा विचार होत होता. त्यातूनच व्यापक दृष्टी होती. कायम दुष्टप्रवृत्तींच्या पराभवामुळे चांगले गुण कसे प्रभावी ठरतात हे सांगण्यात आलेय. छल कपट दुसऱ्याचे लुबाडणे अशामधून किंवा राग लोतभ मत्सर, वासना धर्मविरोधी कृत्य यातून माणसाठी उन्नती होत नाही हे संस्कार केले गेले.
साहस वीरता यांच्या कथांमधून अपप्रवृत्तींच्या विरोधात लढण्याची आस निर्माण केली जाते. आत्ताच झालेल्या रामनवमी किंवा हनुमान जयंती ही उदाहणेही पहा. सत्य युगातील या घटना आजही मौखिक आणि लिखित स्वरूपात ताज्या आहेत. यातून किमान आदर्श राज म्हणजे राम आणि त्याचे रामराज्य मानले जाते. तसे रामराज्य परत यावे यासाठी त्याचेच उदाहरण दिले जाते. संयमाचे मूर्तिमंत रूप म्हणजे श्रीराम. मर्यादा पुरुष एक वचनी एक बाणी एक पत्नी व्रत म्हणजे राम. रामाने वचन दिले ते पाळलेच. रामाने बाण सोडला कि लक्ष्यवेध होणारच. विरता, बुद्धिमत्ता आणि सेवा भक्ती म्हणजे हनुमंत. भक्ती आणि सेवाचा परमोच्च बिंदू हनुमंतात आहे. पुढे येणाऱ्या कृष्ण कथांनी आणि महाभारताने तर अवघे जीवनच उलगडलेय. अन्याय सहन करावा पण एका मर्यादे पर्यंतच. एका मर्यादे पलिकड़े अन्याय सहन करायचा नाही. जशास तसेच उत्तर दिलेच पाहिजे. महाभारत आणि गीता म्हणजे आपले खरे गुरूच आहेत. अंधारात चाचपड असू त्याने गीता वाचावी मनन चिंतन करावे सर्व प्रश्नांची उत्तरं त्यात सापडतात. मन बुद्धी शरीर सर्वच सक्षम असावे आणि त्यांच्याच सहाय्याने जे दुर्बल आहेत त्यांना मदत करावी ही मानवतेची शिकवण आहे. अशी विपुल ग्रंथ संपदा आपल्याकडे आहे. ती परंपरा आजही मिणमिणत्या पणती प्रमाणे कार्यरत आहे.
अलिकडे मात्र आपण जुने म्हणून आपल्या संस्कृतिमधील कित्तेक अस्सल दाणे टाकून दिलेयत. विभक्त कुटुंब आणि बाहेरची वाढती स्पर्धा यामुळे जीवन बदलत आहे. आजी आजोबांची जागा हरवलीय आणि जिथं डोकं टेकवावं असे आदर्श लोप पावत आहेत. त्यातही जेव्हा मोठे सणवार येतात किंवा आदर्श जपावा अशा थोरपुरूषांची जयंती पुण्यतिथी येते तेव्हातरी ते साजरे व्हावेत. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासांची उजळणी व्हावी. धार्मिक पौराणिक कथा मंत्र नाटकं गाणी कविता यांचे जतन डिजिटल युगात केले गेलेय. ते पहावे ऐकावे आणि आपला समृद्ध वारसा हा अखिल मानवाच्या कल्याणासाठी हजारो वर्षांपासून जतन केला गेलाय. तो पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीही असाच पुढे पुढे नेण्याची खरी जबाबदारी आपल्याच खांद्यांवर आहे. त्यामुळे घराघरात त्यासाठी प्रयत्न होत राहिले तर आता वेगळया पद्धतिने सुरू झालेली संस्कृतिंच्या विरोधातील लढाई जिंकणं पारसं अवघड असणार नाही. आपल्या संस्कृतिचा संदेश आहे- हे विश्वची माझे घर. म्हणून ज्ञानदेवांनीही संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर जो प्रसाद मागितलाय ते पसायदान विश्वाच्या कल्याणासाठीच आहे.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)