सुमेधा उपाध्ये / अध्यात्म
अनेकदा अनेकांच्या मनात रेंगाळणारा प्रश्न म्हणजे कर्म कोण करतो? कोणतेही कर्म जीव स्वत: करतो किंवा करीत नाही. प्रत्येक व्यक्ती शरीराच्या इंद्रिंयाकडून एखादे कर्म करतो किंवा कधी करीत नाही. त्यामुळे वरकरणी कर्म हे प्रत्येक जीव स्वत:च करीत आहे असं दिसत असतं. मात्र, इथं जीव कर्ता वाटत असला तरीही तो एक भास आहे. कारण ते कर्म करवून घेणारा किंवा न करण्याची बुद्धी देणाराही ईश्वरच आहे. आपण कितीतरी वेळा अनुभव घेतला असेल की एखादं कार्य करावं असं आपल्याला कितीही वाटत असलं तरीही ते होत नाही. तर काही वेळा कितीही टाळलं तरीही कर्म घडून जातं. त्यामुळे आपल्या हाती फारसं काही नाही याचा प्रत्यय येतो. पण जीवातला अहंकार त्याला असं भासवत असतो की कर्म करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार हाती आहे. या भ्रमात आपला कितीतरी वेळ खर्च पडतो. काही वेळा जे जे उत्तम घडेल त्याचं श्रेय जीव स्वत:कडे घेतो. जेव्हा मना विरूद्ध काही घडतं तेव्हा मात्र ईश्वरावर टाकतो आणि प्रश्नही करतो- हे ईश्वरा असं का घडवलंस?
एका अज्ञानाच्या आवरणात बंदिस्त जीव नेहमी कर्ता आपण आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नात राहतो. अनेक अनुभवांच्या गाठोड्यानंतरही त्याला हे लक्षात येत नाही की आपल्या कर्मानुसार आपलं प्रारब्ध निश्चित झालेलं असलं तरीही त्याचा कर्ता एकमेव ईश्वर आहे. त्याची सत्ता कायम आहे. त्याला शरण गेल्यानंतर, त्याच्या प्रति श्रद्धेय भाव ठेवला, त्यास मनापासून सर्वार्थाने शरण गेलो तर जीवाच्या वर साठलेल्या अनेक अज्ञानाचे पापुद्रे निघू शकतात. पण असं जीव करीत नाही. जो पर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत अज्ञान सरत नाही. ज्ञानाच्या प्रकाशात जीव उजळून निघत नाही.
काहीवेळा प्रश्न पडतो जर सर्व ईश्वराधीन आहे तर सर्वांनाच सत्कर्म करण्याची बुद्धी ईश्वर का देत नाही. कित्तेकदा अप्रिय कर्म घडत असतात. दुष्ट प्रवृत्ती वाढते त्यातून विपरीत घ़टना घडतात. मग ते सर्व थांबवणं शक्य असूनही ईश्वर त्या वाईट कर्मांना थांबवत नाही. असं का घडतं? याची उत्तरं अनेक संतांनी आधीच दिलेली आहेत. याबद्दल कवीश्वर महाराज म्हणायचे की जीवाने मागे केलेली कर्म ईश्वर पाहतो आणि त्या पूर्व कर्मांच्या नुसारच त्या त्या जीवाकडून वर्तमानातील कर्म घडवून घेत असतो. सत्कर्मामुळे सुखाची प्राप्ती होते तर वाईट कर्मांमुळे दु:ख प्राप्त होतं. जो नित्य धर्माने वागतो, चांगली कर्म करतो त्याला अधिकाधिक सुखाची अनुभूती होत राहते. जो कायम अधर्माचं पालन करतो वाईट कृत्य करतो त्याला नंतर अतीव दु:ख होतं. त्याच्या अनेक कामात अडथळे निर्माण होत जातात. ईश्वर हा कायम अलिप्त राहून जीवाच्या कर्मांचा हिशेब माडतो त्यानुसार जे फळ पदरी टाकायचे तेच टाकतो. काहींना प्रश्न प़डतो या जन्मात तर मी कुणाचेही वाईट चिंतत नाही तरीही दु:ख का? पण तो हे विसरतो की या जीवाने या आधी कित्तेक जन्म घेतलेले आहे. त्याचा हिशेब ठेवू शकत नाही तो जमाखर्च त्या ईश्वराकडेच आहे. त्याची फळ ही निश्चित आहेत.
ईश्वर मार्ग दाखवत असतो पण त्यावरून चालण्याची परवानगी तो कर्मांच्या नुसारच देत असतो. भारतीय अध्यात्म हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यात जीवाच्या कल्याणासाठी त्यास स्वातंत्र्य दिलं आहे. निवडीचा अधिकार दिला आहे. अनेक मार्ग दाखवलेत. सर्व मार्ग एका हाईवेलाच जाणारे असले तरीही त्याची निवड ही जीवाच्या कर्मांनुसार जीव स्वत:च निवडत असतो. तरीही ती निवडण्याची बुद्धी ईश्वर देतो. त्या कर्माच्या प्रसंगी जे घडेल त्यातून प्रारब्ध निश्चित होत जातं. त्यामुळे कर्माचा मार्ग निवडला आणि त्यानुसार आचरण केल्यानंतरही त्याचं फळ कसं द्यायचं हे त्या एकमेव सत्ताधीश असलेल्या ईश्वराच्या अधीन आहे. त्यामुळे मोह माया अहंकार यांच्या त्यागातून श्रद्धेय भावनेनं जीवानं सारासार विवेक जागृत ठेवून केलेलं कर्म निश्चित चांगलं फळ देणारं असेल. गीतेत भगवंतांनी जे सांगून ठेवलंय त्यानुसार जीवानं किमान एवढंच करावं, ते म्हणजे, सर्व कर्म करावं मात्र त्याचं श्रेय स्वत:कडे न घेता ते ईश्वरास अर्पण करावं यामुळं ईश्वर त्यानुसार योग्य फळ देतो आणि जीवाचा उद्धार होऊ शकतो.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत)
हेही वाचा: “अष्टांग योग: योगाचे आठ अंग”