सुमेधा उपाध्ये
आपलं आयुष्य काळात बांधलं गेलं आहे. आपण संसारी माणसं या काळाच्या आधारानेच जगत असतो. आपले सर्व आराखडे आपल्या जीवनाबद्दलचे हे भूत आणि भविष्य काळाशी जोडलेले असतात. या सर्वाचा विचार करत आपल्या डोक्यावर कधी चंदेरी छप्पर तयार होतं हे कळत नाही. सर्वांच्या अपेक्षांच्या ओझ्यासह आपल्याही अपेक्षाची त्यात दिवसागणिक भर घालत असतो आणि अत्यंत जबाबदार व्यक्ती हे बिरूद मिरवतो. मात्र, यावेळी आपण विसरलेले असतो की आपल्या जगण्यातला आनंद हरवलाय. आपलं एक मशीन झालंय. आपण हातातून निसटलेल्या क्षणांचा हिशेब करत बसतो, गेलेले परत मिळणार नाही म्हणून दु:खी होतो, तसंच भविष्याच्या काळजीने आतून पोखरत जातो, चिंतेचं सावट चेहऱ्याभर पसरतं अकाली पोक्तपणा येतो. या सर्वांमध्ये आपण कधी वर्तमान जगलोय का, हा प्रश्न पडतो? वर्तमानाचा विचार आपण करत नाही, तो निसटून जातो मग तोच क्षण भूत बनतो, अशातच ज्या क्षणांच्या येण्याची वाट पहात भविष्यातील मनोव्यापार सुरू असतो. या सर्व सरमिसळीत आत्ताचा क्षण जो वर्तमान आहे, तोच जगण्याचं राहून जातं. त्यामुळे आपल्या हातानेच आपण दु:ख आणि चिंता दोन्ही ओढवून घेतो. मात्र, त्यामुळे जीवनातला आनंदच गमावतो.
जगावं वाहत्या पाण्यासारखं खळाळत, प्रत्येक क्षणी नाविन्याचा स्पर्श, वाहतं पाणी हे वर्तमानातच जगत असतं. तिथं ना भूत, ना भविष्याचा विचार, त्याचा प्रत्येक स्पर्श हा वर्तमानाची ग्वाही देत असतो. तशीच दिव्याची ज्योत, पूर्ण वर्तमान, प्रत्येक क्षणाचा प्रकाश नवा, वात जळत असते, तेल सहाय्य करत राहतो आणि ज्योत वर्तमानातील प्रकाश पसरत असते, दिव्याच्या या ज्योतीच्या वर्तमानामुळेच ज्योती त्राटक हे महत्त्वाचं मानलं जातं. आपली दृष्टी यामुळे तेजस्वी होते. स्वच्छ होते, प्रकाशाचं नातं हे दिव्यत्वाकडे घेऊन जाणारं आहे. ज्योतीच्या वर्तमानात अंधार असूच शकत नाही. जो भूतात रमतो तो अंधार ओढवून घेतो म्हणून भूत न पकडता ते सरळ सोडून द्यायचे, ज्योतीसम वर्तमानातला प्रत्येक नवा क्षण समरसून जगता आला पाहिजे. जे घडून गेलेय ते कितीही विचार केला तरीही पुन्हा दुरूस्त होऊ शकत नाही. समज गैरसमज असतील, चुका असतील, सुसंवादाचा अभाव असेल, त्यावर स्पष्टीकरण देणं, म्हणजे ते पुन्हा उगाळून फक्त दु:खच निर्माण होणार. त्यापेक्षा झाले गेले ते गंगार्पण करून वर्तमानात जगलो तर आयुष्य सुव्यवस्थित होतं. जगणं सुकर होतं. तसंच उद्या काय होणार याचाही विचार का करावा… जे घडणार आहे ते तुम्हाला आधी सांगून कधीच घडणार नाही. जे घडणार ते घडणार ते थोपवू शकत नाही, मग चिंता का करावी? जे तुमच्या आमच्या हातातच नाही, त्याची कल्पना करू शकता आणि ती कल्पनाच तुम्हाला घाबरवते. असं घडलं तर…या विचारानेच अर्धे गर्भगळीत होता. तथ्यहीन विचारांच्या भविष्य चिंतेनं एका खोल खाईत का पडावे?
जे घडणार ते घडू द्या ते घडले की भूत होईल, त्या भूताचा विचार करायचा नाहीये, ना भविष्याचा म्हणजे पुन्हा दोन्हीला वजा करून आपल्याला वर्तमानातच जगायचं आहे. वर्तमाना सारखं सुख नाही. घडून गेला तो इतिहास होतो, जे घडू शकतं ते भविष्य असतं. एक दु:ख निर्माण करतं तर दुसरं चिंता निर्माण करतं, त्यामुळं दोन्हीला अलविदा करून, आत्ता जे घडतंय ते समरसून जगणं, त्यासारखा आनंद नाही.
संसारी माणसांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू ‘दु:ख’ हा आहे. कारण मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात त्याला दु:खांशी अधिक संघर्ष करावा लागतो, त्यावरूनच संत तुकारामांची ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ ही उक्ती सार्थ ठरते, याचेच प्रत्यंतर अनेकदा येतं. राजपुत्र सिद्धार्थ सुखांच्या राशीवर पहुडला होता. परंतु वार्धक्य, रोग आणि मृत्यू या तीन प्रखर दु:खांचं साक्षात दर्शन होताच त्याला वैराग्य आलं आणि पुढे बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती होऊन तेच ‘गौतम बुद्ध’ झाले. ‘सर्वम् दुखम्’ याचा उच्चार प्रथम त्यांनी केला असं म्हणतात. वर्तमानात जगताना पाश नसतात ना मागचे ना पुढचे, त्यामुळे ना चिंता ना दु:ख, जे समोर आहे त्याच्याशीच सामना असतो, तो करायचा आणि त्याच्या आत्ताच्या असण्यात स्वत:ला विसरून जाण्यातून कदाचीत आनंदाचा झरा अविरत प्रवाही राहिल.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Very nice
As usual…. eye opener..
very true.