सुमेधा उपाध्ये
राजस्थानातील करमाँची एक प्रसिद्ध कथा आहे. तेथील एक जाट नित्य उपासना करून ठाकूरजीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतरच आपल्या व्यवसायाच्या कामाला जात असे. हा त्याचा दिनक्रम होता. त्याची एक सात आठ वर्षांची मुलगी होती. तो तिला म्हणला कामासाठी परगावी जात आहे. चार दिवसांनी घरी येईन तू पूजा करून नैवेद्य जरूर दाखव त्यानंतरच तू प्रसाद घे. मुलगी अल्लड होती पण समंजस होती. घरात दुसरे कुणी नाही. दुसऱ्या दिवशी तिने लवकर स्नान वगैरे केले आणि खिचडी बनवली. पूजा केली ठाकूरजींना नैवेद्य दाखवला. पण ठाकूरजी काही खात नाही हे पाहून हिरमुसली. ती त्यांस विनवू लागली मी केलेय… खाऊन घे… तरी ठाकूरजी खात नाही. खूप वेगवेगळ्याप्रकारे समजावले दुपार टळून गेली. मला दुसरे काही येत नाही पण उद्या मी प्रयत्न करून पराठे करीन काही गोड करीन आज खाऊन घे. पण ते हलेनात. ताट तसेच समोर पडलेले. ती रडू लागली. खूप हाका मारल्या मला भूक लागलीय ठाकूरजी या जेवून जा. ठाकूरजी ये भोजन कर…खूप वेळ उपाशी असल्याने ती रडत रडत तिथेच पडली. नंतर चमत्कार घडला. ठाकूरजींना यावे लागले. त्यांनी त्या मुलीला उठवले आणि खिचडी भरव म्हणाले – तिने आनंदाने भरवण्यास सुरूवात केली. त्यांनी सगळी खिचडी खाल्ली नंतर तीन दिवस हेच घडले. चौथ्या दिवशी जाट घरी आल्यावर मुलीला म्हणाले ठाकूरजींना भोजन खिलवलेस का. तीने हो म्हटले. पहा बरं मी किती बारीक झालेय. रोज खिचडीच केली आणि ठाकूरजी तुमचे सगळी खात होते. मला ठेवलीच नाही. त्याला आश्चर्य वाटले आज त्याने सर्व नियमाने केले. आता बोलाव ठाकूरजींना , असं म्हणाले. तिने रोजच्या प्रमाणे हाक मारली पण ते येईनात. खूप रडू लागली अखेर ठाकूरजींनी तिच्या कानात सांगितले- तुझे बाबा तुझ्या सारखे निर्मळ नाहीत. तुझ्या सारखा शुद्ध भाव नाही. म्हणून मी समोर येत नाही. नंतर तिने हे सर्व वडिलांना सांगितले आणि त्याने नतमस्तक होऊन ठाकूरजीची क्षमा याचना केली. मला चूक कळली यापुढे सच्चाईने व्यवसाय करीन. मन निर्मळ करण्याचा प्रयत्न करीन वचन दिले नंतर म्हणे ठाकूरजी आले आणि त्याचा नैवेद्य ग्रहण केला. पण जाटास एकदाच असा प्रत्यय आला. करमाँचा मात्र हा नित्यनेम झाला . ठाकूरजी रोज खिचडी खात होते. ठाकूरजी तिला म्हणायचे – कर माँ…जल्दी कर. मंदिरमें जाना है. यावरूनच तिचे नावही करमाँ झाले. पुढे हीच करमाँ जगन्नाथपुरीच्या जवळ राहू लागली आणि तिथेही हाच क्रम सुरू होता. तेथील पुजा-य़ांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी चोरून त्या झोपडीत डोकावले तर खरच जगन्नाथजी भोजन करतात हे समजलं. त्यांना ताटातील खिचडी कमी कमी होताना दिसली पण करमाँच्या मांडिवर बसून ते तिच्या हाताने खिचडी खात आहेत हे दृश्य दिसले नाही. कारण तेच त्या पुजाऱ्यांचा भाव शुद्ध नाही. नित्य पूजापाठ करूनही त्यांचे अंतकरणात ठाकूरजी विषयी शुद्ध प्रेम जागलेले नाही. निर्मळ भाव त्यात जागलेला नाही.
आपल्यालाही सरळ मनाच्या सुस्वभावी व्यक्तिंचा सहवास नेहमीच आवडतो. मग तो परमात्मा आहे. त्याला तरी अनाचारी, अत्याचारी, मनात एक पोटात एक असे ठेवून स्वार्थाने वागणारी माणसे कशी आवडतील? नित्य व्यवहारात आपण किती खोटेपणाने वागत असतो. हाती आलेल्या थोड्याफार अधिकाराने उन्मत्त होतो. ज्या परमात्म्याच्या नित्य सेवेमुळेच त्यानेच जर काही प्राप्त करून दिले तर नंतर त्याच्याच शक्तिच्या आधारे कार्य घडत असतानाही त्याचेही श्रेय स्वत:कडे घेतो. या जगात जे जे उत्तम आहे त्याचे अधिकारी केवळ आपणच आहोत हा स्वार्थ जागा होतो. गरीब, पीडित दु:खी लोकांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांची मदत शुद्ध मनाने न करता त्यांना स्वप्नरंजनात गुंतवून मोठी आमिष दाखवून त्यांच्याच खिशातील असतील नसतील तेही पैसे काढून घेण्याचा प्रयत्न होतो. परिस्थितीने आधीच अडचणीत असलेल्यांची अडचण दूर न होता त्यात वाढच होते. पण खोट्या आशेने लोकंही त्यांच्याकडे जात राहतात. जेव्हा जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अशा स्वार्थी अत्याचारींचा तर तुकाराम महाराजांनी अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे.
प्रत्येकाने आपल्या हाती असेलेले काम प्रामाणिकपणे केले आणि नित्य स्मरणात त्या एकमेव चैतन्य शक्तीला ठेवलं तर अनेक समस्या ओढवल्या जाणार नाहीत. आपली कर्मसंचितांची झोळी आपणच भरलेली आहे त्यामुळे त्याच्यानुसार जे सुख किंवा जे दु:ख आपल्या वाट्याला येईल त्याचा स्वीकार करावा आणि अधिकाधिक त्या परमात्याचे म्हणजेच चैतन्याचे स्मरण ठेवले तर कोणत्याही स्थितित दुख त्रासदायी नसेल. आपला भाव शुद्ध निर्मळ असेल आपले कर्म शुद्ध असेल तर तो परमात्मा आपल्या सहाय्यास उताविळ होईल. परमात्मा खूप दयाळु आहे. पण त्यासाठी त्याला तितकीच आर्ततेने हाक तरी मारायला हवी. ती चैतन्य शक्ती आपल्याला जन्म देते तर तिने आपल्यासाठी निश्चितच काही योजना आधिच आखून ठेवलेली असेल ना. त्यावर दृढ विश्वास हवा. तो दयाळु परमात्मा कधीच कोणास दुख देत नाही. तो सदैव सर्वांच्या कल्याणासाठीच तत्पर आहे. आपण मात्र शुद्ध अंतकरणाने त्याला हाका न मारता चलाख माणसांच्या मधुर वाणीस मात्र भुलतो आणि पुन्हा पुन्हा संकटात अडकत जातो. म्हणून बाह्य देखावा सोडावा आणि त्या करमाँच्या प्रमाणेच आपले मन शुद्ध करावे, प्रेमाने परमात्म्याच्या नामात रंगून जावे आणि नित्य कर्म प्रामाणिकपणे करून ती त्यालाच अर्पण करावीत. मेहनत परिश्रम शुद्ध आचरण यामुळे सदैव तो दयाळुपरमात्मा नक्कीच आपल्या सोबत राहिल. आपली जीवन नैय्या भवसागरातून पार करेल.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)