मुक्तपीठ टीम
लावणी क्षेत्रातील एक हिरा हरपला आहे.महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे आज दुपारी १२ च्या सुमारास मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून काढता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी सुलोचना चव्हाण यांचं कमरेचं हाड मोडलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सुलोचना चव्हाण यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केलं होता. त्यांनी साठ वर्षांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केला आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्यांना लोकांच्या मनात घर केलं आहे.
कोण आहेत पद्मश्री सुलोचना चव्हाण?
- त्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका होत्या.
- भारत सरकारने त्यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
- ठसकेबाज लावण्यांनी सुलोचना चव्हाण यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले होते.
- फडावरची लावणी त्यांनी रुपेरी पडद्यावर लोकप्रिय केली.
- लावणीच्या चपखल, फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांच्या माध्यमातून ठसका देण्याचं काम त्यांनी केलं.
- सुलोचनाबाईंनी लावणीसह भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गायली आहेत.
- सुलोचना चव्हाण यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली.
- मराठी सिनेमांमधील लावणी त्यांची खरी ओळख ठरली.
- ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब त्यांना आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला होता.
रंगल्या रात्री या चित्रपटासाठी “नाव गाव कशाला पुसत? आहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हंटत लवंगी मिर्ची” ही त्यांची पहिली लावणी होती. सोळावं वरीस धोक्याचं, उसाला लागलं कोल्हा, पाडाला पिकलाय आंबा, पावणा पुण्याचा आलाय गं, अशा शेकडो लावण्या त्यांनी अजरामर केल्या आहेत. त्यांनी नंतर मराठी आणि हिंदी चित्रपटांतून तसेच स्टेज परफॉर्मन्समधून अनेक लावणी गायल्या.
सुलोचना चव्हाण यांनी स्वत:ला समाजकार्यातही झोकून दिले होते. कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातील मोठा हिस्सा धार्मिक संस्थांना तसेच गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असून संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला आहे.