सुदर्शन पाटील / व्हाअभिव्यक्त!
ठाणे-पालघर या दोन जिल्ह्यांना व मुंबई-आग्रा, मुंबई-अहमदाबाद या दोन राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा अत्यंत महत्वाचा असणारा भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, रस्त्यावरील मोठ्या खड्यामुळे प्रत्येक भागात तलावासारखे पाणी भरले आहे. अशा बिकट परिस्थितीत हजारो नागरिकांना रोज प्रवास करावा लागतोय, खरंतर वाहन चालकांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. यापरिस्थितीमुळे अपघातही होऊ शकतात.
खरंतर हा महामार्ग बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर दहा वर्षांपूर्वी भिवंडी-वाडा-मनोर या ६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.या कंपनीने केले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत काम असतानाही शासनाने या कंपनीला या मार्गावर कवाड (भिवंडी) व वाघोटे (वाडा) या दोन ठिकाणी टोलनाके उभारण्यास परवानगी दिली.
सात वर्षे सातत्याने टोल वसूल करूनही या कंपनीने या रस्त्याची कामे पूर्ण केली नाहीच, पण नीट देखभालसुद्धा केली नाही. परिणामी गेल्या सात वर्षांत शेकडो अपघात होऊन १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ३०० हून अधिक जण गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलं आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेबाबत येथील राजकीय, सामाजिक संघटनांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. मागील वर्षीही सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या ३० हून अधिक आंदोलनकर्त्यांनी ४० दिवसांचा तुरुंगवासही भोगला आहे. मात्र महामार्गाचा प्रश्न सुटला नाही. अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने दोन वर्षांपासून या महामार्गावरील दोन्ही टोलनाके बंद करून या महामार्गाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपावला आहे. त्यानंतर या रस्त्यावरील दुरवस्था कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली. पावसाळ्यापूर्वीही या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी हून अधिक रक्कम खर्च केली मात्र तरीही वाडा-भिवंडी दरम्यान हा महामार्ग अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. काही ठिकाणी दोन फूट व तीन फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी पाणीच भरून राहिल्याने तलावाच स्वरूप या महामार्गावर निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. ४० किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी वाहनांना सुमारे तीन तास तर कधी चार तास अवधी लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक त्रस्त झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना जो प्रवास करताना त्रास होतोय याला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी व लोकप्रतिनिधी वर बहिष्कार टाकण्यासंदर्भात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
(सुदर्शन बाळाराम पाटील हे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे सदस्य आणि शिवप्रेरणा सेवाभावी मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख आहेत.)