मुक्तपीठ टीम
भारताने जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी ओडिशाच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या चांदीपूर येथे घेण्यात आली. या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हे क्षेपणास्त्र उभ्या प्रक्षेपकाद्वारे कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून लाँच करण्यात आले.
क्षेपणास्त्राची कामगिरी अपेक्षेप्रमाणे असल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारतीय नौदलाने त्याची तयारी केली आहे. या चाचणीवेळी डीआरडीओ आणि नौदलाचे अधिकारीही उपस्थित होते. त्याची पहिली चाचणी यावर्षी २२ फेब्रुवारीला झाली.
“अत्यंत कमी उंचीच्या इलेक्ट्रॉनिक लक्ष्यावर उभ्या लाँचरमधून क्षेपणास्त्र सोडण्यात आले,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. क्षेपणास्त्राचे उड्डाण, त्याचा मार्ग आणि इतर डेटा, पॅरामीटर्स रेकॉर्ड करण्यात आले. मंत्रालयाने सांगितले की, “क्षेपणास्त्र प्रणालीने अपेक्षेप्रमाणे काम केले. ही चाचणी पाहण्यासाठी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारीही चांदीपूरमध्ये उपस्थित होते.”
क्षेपणास्त्राची विशेष वैशिष्ट्ये
- या क्षेपणास्त्राची रेंज ५० ते ६० किमी असून ते जमिनीवरून हवेत मारा करू शकते.
- हवेतून येणारा धोका या क्षेपणास्त्राद्वारे हवेतच नष्ट केला जाऊ शकतो.
- हे क्षेपणास्त्र नौदलाच्या युद्धनौकांवर तैनात केले जाईल.
- या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, नौदल आणि प्रकल्पाशी संबंधित सर्व लोक आणि संस्थांचे अभिनंदन केले.
- ते म्हणाले की, या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे हवाई धोक्यांविरुद्ध भारतीय नौदलाची क्षमता आणखी मजबूत होईल.
- डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी या चाचणीत सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले.