मुक्तपीठ टीम
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सहार गाव परिसर आहे. सहारगाव पेट्रोल पंप समोरील रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यामध्ये एक गाय पडली. नाला अरुंद असल्याने ती तेथेच अडकून पडली. स्थानिक नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी आपल्या परीने तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण त्यांना आईच्या अवजड आकारामुळे यश मिळाले नाही. स्थानिकांनी सहार पोलीस ठाण्यात कळवले.
नाल्यात गाय अडकल्याची माहिती मिळताच सहार पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल राहुल राठोड यांनी अग्निशमन दलाला कळवले. मुंबई अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी सोनवणे यांनी तात्काळ आपल्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांसह गाईच्या बचाव कार्यास सुरुवात केली. नाला खोल नव्हता, पण अरुंद असल्याने गाईला बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यामुळे तिच्याभोवती दोऱ्या बांधण्यात आल्या. त्यानंतर खूप सावकाश तिला आधार देत बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. गाईच्या वजनामुळे तिला बाहेर काढणे सोपे नव्हते. तसेच तिला बाहेर काढताना नाल्याच्या कपारींमुळे इजा होण्याची भीती असल्याने तीही काळजी घेतली जात होती. अखेर काही वेळाने तिला बाहेर काढण्यात आले.
सहार पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल राहुल राठोड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिभा पाटील यांच्यासह या वेगळ्या कर्तव्यात सहभाग घेतला. तसेच अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी सोनवणे यांनीही तत्परतने योग्य कार्यवाही केली. सामाजिक कार्यकर्ते ( मा. सुनील आर्या पिंटू यांनीही समन्वयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून सर्वांना खास धन्यवाद देण्यात आले.