मुक्तपीठ टीम
राज्यातील युवकांच्या नाविन्यतेस चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व Cisco Launchpad यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” चे आयोजन करण्यात आले आहे. या सिरीजमध्ये प्रारंभिक टप्प्यातील तरुण विद्यार्थी, नवउद्योजक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी व्यवसाय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील अभ्यास व माहिती सत्रे आयोजित केली जाणार आहेत. हे सत्र उद्योग व नाविन्यता परिसंस्थेतील तज्ञांद्वारे घेतले जाणार असून ज्यामधे कल्पना तयार करणे, कल्पना संरक्षित करणे आणि कल्पनेचा विस्तार करणे याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिली.
उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२२ आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://msins.in/events या संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी केले.
व्यवसाय सत्रे २५ ते २९ एप्रिल २०२२ रोजी होणार असून सत्रांमध्ये उत्पादन विकास, डिझाइन विचार, आर्थिक व्यवस्थापन, निधी उभारणे, त्याचा वापर यासारख्या विस्तृत विषयांचा समावेश असेल. तसेच तंत्रज्ञान सत्रे २ मे ते ६ मे २०२२ रोजी होणार असून सत्रांमध्ये AI, IoT, क्लाउड कम्प्युटिंग आणि ब्लॉकचेन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश असेल.
या सिरीज अखेरीस एक “पिच डे” आयोजित केला जाणार असून सहभागी झालेल्या नवउद्योजकांना त्यांच्या कल्पना गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्यासमोर सादर करण्याची संधी मिळेल. सत्र पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल. विजेत्या आणि उत्कृष्ट कल्पनांना सिस्को लाँचपॅडतर्फे विशेष मार्गदर्शन तसेच क्रेडिट्स आणि १.५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळेल. “इंडिया टेक्नोप्रेन्योरशिप सिरीज” उपक्रमामुळे राज्यातील होतकरु विद्यार्थी, उद्योजक, नवउद्योजक आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपचे संस्थापक यांना विशेष लाभ होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण” जाहीर केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.
पाहा व्हिडीओ: