मुक्तपीठ टीम
आपल्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या टेबल टेनिसचे रौप्य पदक पटकावले. भाविनावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या अद्वितीय यशामागे आहे तिचा प्रतिकुलतेशी झुंजत झालेला संघर्षमय प्रवास. तिची संघर्षमय यशोगाथा प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी. कारण तिला इथं पोहोचण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागले.
जन्मानंतर १२व्या महिन्यात झाली होती पोलिओची शिकार
- भाविना पटेलचा जन्म ६ नोव्हेंबर १९८६ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडगर या छोट्या गावात झाला.
- जन्मानंतर अवघ्या १२ महिन्यांनी तिला पोलिओने ग्रासले.
- पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकमेव कमावणारे होते.
- परिस्थिती तशी बेताची असल्याने वडिलांना आपल्या मुलीवर उपचार करता आले नाही.
- यानंतर, तिच्यावर विशाखापट्टणमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
टेबल टेनिसमध्ये केले करिअर
- गरिबी आणि पोलिओशी झुंज देत असूनही भाविनाने कधीही हार मानली नाही.
- तिने मन रमवण्यासाठी म्हणून टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. व्हीलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळत असताना तिने त्यात करिअर करण्याचा विचार केला, ज्यात ती यशस्वी झाली.
- २०११ मध्ये पीटीटी थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर तिने प्रसिद्धी मिळवली.
- त्यानंतर तिने ऑक्टोबर २०१३ मध्ये बीजिंग आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरी स्पर्धा क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला.
- त्यावेळी ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची टेनिसपटू होती.
भाविनाचे देदिप्यमान पुनरागमन
- चार वर्षानंतर, भाविनाने २०१७ मध्ये पुन्हा एकदा बीजिंगमध्ये चमत्कार घडवला.
- तिने आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्यात यश मिळवले.
- भाविना ही क्लास ४ ची पॅरा अॅथलीट आहे.
- क्लास ४ श्रेणीतील खेळाडू हे पाठीचा कणा कमजोर झाल्यामुळे किंवा सेरेब्रल पाल्सीमुळे कमजोर असू शकतात.
उल्लेखनीय बाब अशी की आता जागतिक यशानंतर तिचं कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी २०१०मध्येही तिला दुसरी खेळाडू प्रोत्साहन दिलं होतं. आज त्यांचा भाविनासोबतचा फोटो त्यामुळे व्हायरल झाला. भविष्यातही आपल्या भाविनानं असंच यश मिळवावं, यासाठी मुक्तपीठच्या आभाळभर शुभेच्छा.