मुक्तपीठ टीम
विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारून आणि समजवून प्रयत्न केले जात आहेत.
नागपूर विभागात आयुक्तांचे स्पष्ट निर्देश
नागपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या संदर्भातील स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागपुरात गरज वाटेल त्या ठिकाणी सक्तीने कारवाईचे आदेश
नागपूर : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे, लसीकरण पूर्ण क्षमतेने करणे आणि सोबतच कोणत्याच परिस्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणे या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचे असून यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर सामंजस्याने व सहकार्याने पूर्ण गतीने कार्यरत व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्या खासगी रुग्णालयात सिटीस्कॅन केले जाते, तेथे रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याबाबत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास किंवा शासकीय वैद्यकीय रुग्णालय- नियंत्रण कक्ष येथे त्या रुग्णाची माहिती त्वरित द्यावी. तसेच संबंधित रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास सूचना द्याव्यात. यात दिरंगाई करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
अकोल्यात दर रविवारी संपूर्ण तर रात्रीही संचारबंदी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.