मुक्तपीठ टीम
राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या धर्तीवर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय कारणास्तव कर्मचाऱ्याने सेवा निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे साकल्याने विचार करून शासनास शिफारस करण्यात आली असल्याचे व यासंदर्भात सकारात्मक असल्याचे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन (NPS) योजनेतील (पूर्वीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना- DCPS) त्रृटींचा अभ्यास करण्यासाठी राज्यमंत्री (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटासमवेत कर्मचारी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.
या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विविध संघटनेचे सचिव उपस्थित होते. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्य कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, अभ्यासगटात या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल. निवृत्ती वेतन योजनेतील त्रृटी आणि शासनावर येणारा आर्थिक भार यासदंर्भात अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
विविध संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळावे तसेच सेवेत असताना वैद्यकीय कारणास्तव कर्मचारी निवृत्त झाल्यास अशा कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन लागू करण्याची शिफारस शासनास अभ्यासगटाद्वारे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.