मुक्तपीठ टीम
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३७, मधील ३ हजार ५०० चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सारथी संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व मुंबई येथे विभागीय कार्यालय, वसतिगृहे, अभ्यासिका व ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र, जेष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इ. सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी ५०० मुलांचे व ५०० मुलींचे स्वतंत्र निवासी वसतीगृह देखील विकसित करण्यात येईल.
याअंतर्गत नवी मुंबई येथील केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर ३७, मधील ३५००.०० चौ.मी.क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.