मुक्तपीठ टीम
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची अपेक्षित घोषणा आज परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त पत्रकार परिषदेत झाली नाही. अर्थमंत्री अजित पवारांशी झालेल्या चर्चेनंतर परिवहन मंत्री अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केली. मात्र, त्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले भाजपा नेते सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी संप मागे घेण्याची घोषणा ही आझाद मैदानातील संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर करणार असल्याचं जाहीर केलं. आता सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगणाऱ्या नेत्यांपुढे आता संपकरी कर्मचाऱ्यांना समजूत काढून त्यांना कामावर परतण्यासाठी तयार करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता पडळकर-खोत हे आझाद मैदानात काय घोषणा करतात, तेथे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळालं?
- एसटीचे शासनाच्या सेवेत विलिनीकरण करण्यात यावं यासाठी गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी संपावर आहेत. विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयासमोर असून समितीच्या अहवालानंतर यावर निर्णय होणार आहे. पण तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
- आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ असल्याचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा दावा
- या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारचा वर्षाला ६० कोटींचा खर्च वाढणार आहे.
- जवळजवळ ४१ टक्के पगार वाढ
- जे कर्मचारी १ ते १० वर्ष सेवेत आहेत त्यांना मूळ वेतनात ५००० रुपये पगारवाढ
- १० ते २० वर्षे सेवा झालेल्यांना मूळ वेतनात ४ हजार रुपयांची वाढ
- २० वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात२ हजाराने वाढ
- १२ हजार ८० रुपये होतं त्याचं आता १७ हजार असेल
- ज्यांचा पगार १७ हजार होता तो २४ हजार असेल
- सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांना सात हजाराची वाढ
- आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत
- निलंबित, सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारीपासून त्वरित सेवेवर रुजू झाल्यास रुजू करून घेतले जाईल.
- एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता १० तारखेच्या आत होणार
शरद पवारांशी बैठकीनंतर परबांचा मध्यम मार्ग!
अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि अर्थमंत्री अजित पवार यांना बोलावून चर्चा केली. त्या बैठकीनंतर परिवहन मंत्री अनिल परबही मध्यम मार्गाची भाषा बोलू लागले. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी व्यावहारिक भूमिका घेतल्याने विलिनीकरणासाठी टोकाची भूमिका घेणारे भाजपा नेते गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांनीही सामोपचाराची भूमिका घेतली.
प्रस्तावाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर!
दिवसभरातील बैठकसत्रानंतर परिवहन मंत्री अनिल परब हे प्रस्ताव घेऊन रुग्णालयात दाखल असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. त्यांनी त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर अॅड अनिल परब यांनी वेतनवाढीची घोषणा केली.