क्रीडा थोडक्यात: १) स्विस खुल्या सुपर ३०० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनपुढे निभाव लागला नाही. मरिनने केवळ ३५ मिनिटांत सिंधूला पराभवाची धूळ चाखली. मरिनने अंतिम सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत २१-१२, २१-५ अशा फरकाने सिंधूला नमवले. त्यामुळे सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. २) भारतीय महिला क्रिकेट संघाने जवळपास वर्षभरानंतर पहिला आंतरराष्ट्रीय समाना खेळला. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. भारताने ५० षटकांत ९ बाद आणि १७७ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाने उभी केलेली धावसंख्या ४०.१ षटकांत २ बाद १७८ धावा करत पार केली आणि पहिल्या एकदिवसीय सामना आपल्या नावे केले. ३) आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकवणारा मुंबई इंडियन्स संघ यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. तसेच या हंगामात मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या घरच्या मैदान असलेल्या चेपॉत मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्ली ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकत्तामध्ये २ समाने खेळले जाणार आहेत. ४) मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच सुवर्णपदकाची कमाई करत ती या वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप घेतली आहे. अंतिम फेरीत विनेशने कॅनडाच्या डायना मेरीचा ४-० असा पराभव केला.